अमळनेर : 2 तपानंतर मानाचा तुरा, शेतमजुराचा मुलगा झाला मुंबई पोलीस
अमळनेर : दारिद्र्य व बिकट परिस्थितीचा सामना करीत पिंगळवाडे (ता. अमळनेर) येथील शेतमजुराचा मुलगा मनोज सपकाळे याने मेहनत व जिद्दीच्या जोरावर वर्दीचा राजमार्ग सुकर केला आहे. मुंबई पोलिस म्हणून निवड झालेल्या मनोजची गावात डीजे लावून मिरवणूक काढण्यात आली. पिंगळवाडे येथील मनोज सपकाळे याने दारिद्र्य व बिकट परिस्थितीशी दोन हात करीत पोलिस होण्याचे स्वप्न सत्यात उतरविले आहे. आई सुनीता सपकाळे, वडील राकेश सपकाळे तसेच शिक्षणासाठी मदत करणारा मोठा भाऊ अजय सपकाळे यांच्या कष्टाचे चीज केले. मनोजचे प्राथमिक शिक्षण पिंगळवाडेत, उच्च प्राथमिक शिक्षण मामाच्या गावी अंबापिंप्री (ता. पारोळा) येथे, त्यानंतर माध्यमिक शिक्षण निंभोरा येथील शाळेत तर बारावीपर्यंतचे शिक्षण अमळगाव येथील आदर्श हायस्कूल येथे पूर्ण केले. तसेच पदवी व पदव्युत्तर शिक्षण एमए (राज्यशास्त्र) प्रताप महाविद्यालय अमळनेर येथे पूर्ण केले. गावातील जिल्हा परिषद शाळेत असलेल्या अभ्यासिकेत मेहनत व चिकाटीने स्पर्धा परीक्षेची तयारी करीत सोबत पोलिस भरतीसाठी ‘ग्राऊंड’ची तयारी म्हणून अमळनेर तालुका क्रीडा संकुलच्या रनिंग ट्रॅकवर न चुकता सराव केला. मेहनतीने मिळालेले यश ८२ उमेदवारांच्या रद्द झालेल्या प्रतीक्षा यादीमुळे थोड्यासाठी हुकले होते. परंतु आपल्या मेहनतीवर पूर्ण विश्वास असलेल्या मनोजने पुढील भरतीसाठी प्रयत्न सुरूच ठेवले होते. त्यातच मुंबई पोलिस शिपाई (चालक) भरती २०२१ च्या प्रतीक्षा यादीतील ८२ उमेदवारांचा समावेश अंतिम निवड यादीत झाल्याने मनोजच्या मेहनतीला व जिद्दीला उशिरा का होईना पण फळ मिळाले. मनोजच्या या निवडीबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. पिंगळवाडेच्या सरपंच मंगला देशमुख, उपसरपंच अतुल पाटील, निवृत्त प्रांताधिकारी भागवत सैंदाणे, माजी पोलिस पाटील तथा आजोबा नाना सपकाळे, आजी सुमनबाई हिरामण सपकाळे, काका भीमराव सपकाळे, दिनेश सपकाळे, जिल्हा परिषद पिंगळवाडे शाळेचे शिक्षक दत्तात्रय सोनवणे, प्रवीण पाटील, रवींद्र पाटील, वंदना ठेंग, वंदना सोनवणे, अभ्यासिकेतील सहाध्यायी विद्यार्थी अमोल पारधी, विपुल पाटील, संदीप पाटील, प्रमोद पारधी, विशाल सपकाळे, श्रीक्षेत्र पिंगळवाडे येथील ग्रामस्थ व शिक्षणप्रेमी यांनी अभिनंदन केले आहे. ••{“माझ्या यशाचे खरे श्रेय आई-वडील, भाऊ व मार्गदर्शक शिक्षक यांना जाते. उच्च शिक्षणाद्वारे स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेऊन यापेक्षा मोठे पद मिळविण्याचा माझा मानस आहे.” – मनोज सपकाळे, पिंगळवाडे, ता. अमळनेर}