Advertisement

जीवन जगण्याची कला व जीवनमूल्ये आत्मसात करून विद्यार्थ्यांनी भावी आयुष्याची वाटचाल करावी: डॉ. दीपक ननवरे

जीवन जगण्याची कला व जीवनमूल्ये आत्मसात करून विद्यार्थ्यांनी भावी आयुष्याची वाटचाल करावी: डॉ. दीपक ननवरे


दिनांक : 03 फेब्रुवारी 2026 मंगळवार सोलापूर श्राविका संस्थानगरस्थित उमाबाई श्राविका विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे तर प्रमुख पाहुणे म्हणून डी.ए. व्ही. वेलणकर कॉलेज ऑफ कॉमर्स, सोलापूर येथील इंग्रजी विषयाचे प्रमुख डॉ. दीपक ननवरे, प्रशालेच्या मार्गदर्शिका दीप्ती शहा, उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित, पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ, इयत्ता दहावी चे वर्गशिक्षक अनंत बळळे, अभिनंदन उपाध्ये, सरस्वती शेटे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते विद्येची आराध्य देवता माता सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. प्रशालेतील सहशिक्षिका सोनाली उंडे व पल्लवी खांडवे व इयत्ता नववी ब तील विद्यार्थिनींनी गायलेल्या सुमधुर गीताद्वारे प्रमुख अतिथींचे शब्दसुमनांनी स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे सर यांनी केले. आपल्या प्रास्ताविकाच्या माध्यमातून त्यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शालांत परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच विद्यार्थ्यांनी शाळेतील संस्कार, शिस्त व ज्ञान चांगल्या प्रकारे ग्रहण केले तरच विद्यार्थ्यांचे जीवन घडेल असा मोलाचा संदेशही विद्यार्थ्यांना दिला. माती व मातेला जीवनात कधीही विसरू नका असा सल्लाही विद्यार्थ्यांना त्यांनी दिला. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांकडून 100% निकालाची अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रशालेतील सहशिक्षिका सारिका महाडिक यांनी आपल्या अमोघ वाणीद्वारे उपस्थितांना करून दिला. प्रशालेच्या वतीने प्रमुख अतिथी डॉ. दीपक ननवरे यांचा सत्कार शाल,श्रीफळ,बुके व जीवन ज्योत पुस्तक भेट देऊन करण्यात आला.


आपल्या मनोगता द्वारे प्रमुख अतिथी डॉ. दीपक ननवरे विद्यार्थ्यांनी जीवनात वेळेचे महत्त्व ओळखून वेळेचे नियोजन करावे,काळाच्या गरजा लक्षात घेऊन विद्या शाखेची निवड करावी तसेच इतरांशी स्पर्धा न करता स्वतःशी स्पर्धा करा, आई वडील ,शिक्षकांप्रति नेहमी आदराची भावना बाळगावी इ अनमोल असे मार्गदर्शन इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना करून भावी वाटचालीसाठी व शालांत परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. प्रशालेतील विद्यार्थिनी अदिती चव्हाण, विद्या कुर्ले, अनुष्का साळुंके यांनी आपल्या मनोगताद्वारे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांबद्दलच्या अनुभवांना मनोगताद्वारे मोकळी वाट करून दिली तसेच इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी संस्कृती कसबे यांनी प्रशालेतील शिक्षकांनी आपल्याला कशा पद्धतीने विविध संस्कार, शिस्त अभ्यासाचे विविध धडे दिले व शाळेविषयी असलेल्या असंख्य आठवणींना मनोगताद्वारे उजाळा दिला.
यावेळी प्रणिती शिंदे व प्रचिती जवळकर यांनी शिक्षकांबद्दलच्या कृतज्ञेतून त्यांच्या उल्लेखनीय कार्य व स्वभाव वैशिष्ट्यांवर आधारित शेलापागोटे (Fish Pond)हा शुभेच्छा संदेशाचा कार्यक्रम सादर करून अनोख्या पद्धतीने शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. इयत्ता दहावी अ ब क च्या विद्यार्थ्यांनी आपली आठवणरुपी भेट म्हणून प्रशालेस एक संगणक व दोन लोखंडी कपाट भेट स्वरूपात दिले. त्याचा स्वीकार मान्यवरांनी केला.
प्रशालेतील सहशिक्षिका सरस्वती शेटे व सहशिक्षक अनंत बळळे यांनी विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववी ब मधील विद्यार्थिनी नंदिता तळभंडारे व विना चव्हाण यांनी तर आभार आनंदी कामूर्ती या विद्यार्थिनीने मानले. इयत्ता नववी ब च्या वर्गशिक्षिका केतकी सोनटक्के यांच्या मार्गदर्शनानुसार नववी ब तील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे सुंदर नियोजन केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख माधवी खोत, प्रीती वऱ्हाडे,सोनल आळंद इयत्ता दहावी अ ब क चेवर्गशिक्षक तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!