ब्रेकिंग : मालेगाव नरडाणे सेविकेला मारहाण, गुन्हा दाखल करावा – संघटनेची मागणी.
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना,•• मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे काम करणाऱ्या सेविकेला मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा – संघटनेची मागणी. एकात्मिक बाल विकास सेवा योजना मालेगाव ग्रामीण अंतर्गत नरडाणे आदिवासी वस्ती येथे कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका श्रीमती खट्याबाई कौतिक बोराळे ह्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज ऑफलाईन व ऑनलाईन भरत असताना एकाच कुटुंबातील चार महिलांचा अर्ज भरण्याचा आग्रह काही नागरिकांनी केला असता शासन निर्णयानुसार कुटुंबातील फक्त दोनच महिलांचे अर्ज भरण्याची तरतूद सदर योजनेत असल्याचे श्रीमती बोराळे यांनी सांगितले असता त्याचा राग आल्याने श्री बापू सदा सोनवणे, अण्णा सदा सोनवणे, तुकाराम सदा सोनवणे आणि श्रीमती लक्ष्मीबाई रवींद्र वाघ यांनी अंगणवाडी सेविका श्रीमती खटाबाई बोराळे यांना मारहाण करून दुखापत केली. घडलेल्या घटनेबाबत श्रीमती बोराळे यांनी प्रकल्प कार्यालय आणि पोलीस स्टेशनला परिस्थिती कथन करून संरक्षण देण्याची मागणी केली असता प्रकल्प कार्यालय आणि पोलीस स्टेशन यांनी श्रीमती बोराळे यांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण दिले नाही. परिणामी श्रीमती बोराळे यांनी संघटनेला कळविले असता मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचे काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना संरक्षण देण्याची जबाबदारी प्रकल्प कार्यालयाची असतानाही श्रीमती बोराळे यांना प्रकल्प कार्यालयाने कोणतेही संरक्षण दिले नसल्याने संघटनेने नाराजी व्यक्त केली. श्रीमती बोराळे यांना मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या श्री बापू सदा सोनवणे, अण्णा सदा सोनवणे,तुकाराम सदा सोनवणे आणि श्रीमती लक्ष्मीबाई रवींद्र वाघ यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशा आशयाचे निवेदन आज मालेगाव ग्रामीणचे बालविकास प्रकल्प अधिकारी श्री. नरेंद्र अहिरराव आणि मालेगाव तालुका पोलीस स्टेशनला संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टंडळाने दिले. त्यावर मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासंबंधी पोलिस स्टेशनला पत्र दिले जाईल असे बालविकास प्रकल्प अधिकारी श्री अहिरराव यांनी शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळात श्रीमती खट्याबाई बोराळे,श्रीमती अनिता वाघ,परीक्षा वाघ,मोनिका जाधव, वंदन निकम,उज्वला देवरे,जयश्री बोळणे,शैला गोरे,मंगला वायडे, सविता परदेशी,अनिता बच्छाव यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाल्या होत्या. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना संरक्षण न दिल्यास अंगणवाडी कर्मचारी सदर योजनेच्या कामावर बहिष्कार टाकतील तसेच प्रकल्प कार्यालय आणि पोलीस स्टेशन समोर तीव्र आंदोलन करतील असा इशाराही संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांनी सदर निवेदनाद्वारे दिला आहे.