मुंबई : पत्नी बाहेर जाताच पतीची नियत फिरली, 20 वर्षीय मुलीवर…
मावशीच्या घरी आलेल्या एका २० वर्षीय तरुणीवर काकानेच लैंगिक अत्याचार केला. ही संतापजनक घटना मुंबईतील एका परिसरात घडली. याप्रकरणी पीडित तरुणीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी ३५ वर्षीय आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २० वर्षीय तरुणी मुंबईतील (Mumbai News) एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. पीडितेची मावशी आणि आरोपी काका मुंबईतच राहतो. १५ जून रोजी ड्यूटी संपल्यानंतर पीडित तरुणी मावशीला भेटायला तिच्या घरी गेली. यावेळी आरोपी काका देखील घरातच होता. दरम्यान, पीडितेची मावशी काही कामानिमित्त बाहेर गेली. तेव्हा आरोपी काकाने पीडितेसोबत लगट करण्याचा प्रयत्न केला. या गोष्टीला पीडित तरुणीने विरोध केला. त्यावेळी आरोपीने किचनमधून चाकू आणला. याच चाकूचा धाक दाखवून त्याने तरुणीवर लैंगिक अत्याचार (Crime News) केला. अत्याचारानंतर आरोपीने पीडित तरुणीचे व्हिडीओ देखील काढले. याबाबत कुणालाही सांगितल्यास समाजमाध्यमांवर व्हिडीओ टाकून तुझी बदनामी करेल, अशी धमकी देखील आरोपीने तरुणीला दिली. या संपूर्ण प्रकारानंतर पीडिता मानसिक तणावात गेली. सुरुवातीला याबाबत कुणालाही सांगितले नाही. मात्र, आरोपी काकाकडून पुन्हा शरीरसंबंधांची मागणी होत असल्याने पीडितेने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं कळताच आईच्या पायाखालची जमीनच सरकली तिने तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. पीडित तरुणीचीराजावाडी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.