ब्रेकिंग! पाचोऱ्यातील तरुणाला 11 लाख 50 हजाराचा गंडा.
रिपोटर चेतन सरोदे / प्रभाकर सरोदे
मॅकडोनल्डची एजन्सी देण्याच्या बहाण्याने पाचोऱ्यातील तरुणाला 11 लाख 50 हजाराचा गंडा. पिझ्झा विक्रीसाठी प्रसिध्द असलेल्या मॅकडोनल्डची एजन्सी देण्याच्या बहाण्याने पाचोरा येथील एका तरुणाला 11 लाख 50 हजारांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी तरुणाच्या फिर्यादीवरुन हरिष जैन या संशयीताविरोधात दिनांक 16 मे रोजी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक 18 मे रोजी हाती आलेली आहे. पाचोरा शहरातील जतीन केसवानी (22, जामनेर रोड, पाचोरा) या तरुणाला पाचोऱ्यात पिझ्झा विक्रीची फ्रेंचाइजी घेण्यासाठी हरिष जैन नामक व्यक्तीचा फोन आला. त्यानंतर त्या युवकाकडून ऑनलाईन अर्ज भरुन घेण्यात आला तसेच आवश्यक कागदपत्रंदेखील मागविण्यात आले. सर्व प्रक्रिया पारदर्शक असल्याचे भासवून संबधिताने युवकाचा विश्वास संपादन केला. तसेच या व्यवसायात कोणी भागीदार असल्याचीही विचारणा करून त्याचीदेखील माहिती ऑनलाईन भरून देण्यात आली. सर्व माहिती दिल्यानंतर, जैन या व्यक्तीने त्याचा बँक खात्याचा क्रमांक देऊन, त्या खात्यावर फ्रेंचाइजीसाठीची रक्कम भरण्यास सांगितली. जतीन केसवानी या युवकाने 26 एप्रिल ते 5 मे दरम्यान एकूण 11 लाख 50 हजार 500 रुपयांची रक्कम संबंधिताच्या खात्यावर वर्ग केली मात्र त्यानंतर संबधित व्यक्तीने तीन दिवसांपासून फोन बंद केला. युवकाने संपर्क साधला असता तो न झाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्या युवकाने गुरुवारी सायबर पोलिसांकडे हरिष जैन नामक व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम करीत आहेत.