सत्यार्थ न्यूज प्रतिनिधी- किरण माळी (जळगाव महाराष्ट्र)
अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळे सरकारच्या ताब्यात नाही; तर हिंदूंची मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त करा !- पू. रामगिरी महाराज, नगर
शिर्डी– प्रतिकृल परिस्थितीत संतांनी मंदिरांची संस्कृती टिकवून ठेवली. सद्यस्थितीत हिंदू केवळ तीर्थक्षेत्राला जातात; परंतु त्या तीर्थक्षेत्रांचे पावित्र्य नष्ट होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करतात. अध्यात्म आपल्या श्वासात आणि रक्ताच्या प्रत्येक थेंबात यायला हवे. हिंदू धर्माविषयी निष्क्रिय राहिले, तर भविष्यात जगणे कठिण होईल. कोट्यवधी रुपयांचे व्यवहार होत असूनही भारतातील एकही मशिद किंवा चर्च सरकारने ताब्यात घेतलेले नाही. अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळे सरकारच्या ताब्यात नाही; मात्र हिंदूंचीच मंदिर सरकारच्या ताब्यात का ? त्यामुळे आता हिंदूंची मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त करावीत, अशी मागणी नगर येथील सद्गुरु गंगागिरी महाराज संस्थानचे मठाधिपती पू. रामगिरी महाराज यांनी केली. महाराष्ट्र मंदिर महासंघ, विरार येथील श्री जीवदानी देवी संस्था, श्री ज्योतिर्लिंग भीमाशंकर देवस्थान, श्री साई पालखी निवारा आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने श्री साई पालखी निवारा, शिर्डी येथे आयोजित तृतीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’च्या प्रथम दिनी ते बोलत होते. या परिषदेला संपूर्ण महाराष्ट्रभरातून ७५० हून अधिक निमंत्रित मंदिराचे विश्वस्त, प्रतिनिधी, पुरोहित, मंदिरांच्या रक्षणासाठी लढा देणारे अधिवक्ते, अभ्यासक आदी सहभागी आहेत.
परिषदेचा प्रारंभ श्रीक्षेत्र बेट कोपरगाव येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज समाधी मंदिराचे पू. रमेशगिरी महाराज, कोपरगाव येथील श्रीक्षेत्र राघवेश्वर देवस्थानचे मठाधिपती पू. राघवेश्वरानंदगिरी महाराज, सनातन संस्थेचे सद्गुरु सत्यवान कदम, मुंबई येथील समस्त महाजन संघाचे अध्यक्ष श्री. गिरीष शहा, श्री जीवदानी देवी संस्थानचे अध्यक्ष श्री. प्रदीप तेंडोलकर आणि मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाला. यानंतर सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी दिलेल्या संदेशाचे वाचन सद्गुरु सत्यवान कदम यांनी केले. ‘भारतात खर्या अर्थाने रामराज्य आणायचे असेल, तर प्रत्येक मंदिराने राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी आवश्यक अशा मंदिर संस्कृतीचे पुनरुज्जीवन करणे अपरिहार्य आहे’, असे त्यांनी संदेशात म्हटले आहे.
उपस्थितांचे स्वागत श्री. प्रदीप तेंडोलकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या प्रसंगी श्री. तेंडोलकर म्हणाले, ‘‘मंदिरांचे संवर्धन हे भगवंताचे कार्य आहे. त्यामुळे या कार्यासाठी ईश्वरानेच आपणाला एकत्र आणले आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून मागील ३ वर्ष झालेली कार्ये निश्चितच उल्लेखनीय आहेत. या परिषदेच्या माध्यमातून सर्व विश्वस्तांना एक व्यासपीठ प्राप्त झाले आहे.’’ मंदिर महासंघाचा कार्यात्मक आढावा महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी मांडला. *या वेळी श्री. घनवट पुढे म्हणाले की* , लोकसभेच्या निवडणुकीत धर्मांधांनी त्यांची रणनिती मशिदींमध्ये ठरवली. मतदान कुणाला करावे, यासाठी फतवे काढले हे ठरवले, तर मग हिंदु धर्म आणि राष्ट्र यांविषयीची रणनीती मंदिरांमध्ये का निश्चित केली जाऊ नये ? या परिषदेला एकवटलेल्या हजारो विश्वस्तांनी रस्त्यावर उतरून मंदिरे सरकारीकरणापासून मुक्त करण्यासाठी मागणी केली, तर सरकारला मंदिरे सरकारीकरणापासून मुक्त करावीच लागतील. अशाप्रकारे प्रत्येक विश्वस्ताने ‘आपल्या मंदिरातून हिंदूसंघटन कसे करता येईल ?’, त्याचा विचार करून कार्य केल्यास भविष्यात हिंदूंना सुरक्षा देण्याचे कार्यही मंदिरांद्वारे करता येऊ शकते.
मंदिरांतूनच संस्कार केले, तरच राष्ट्रप्रेमी पिढी निर्माण होईल ! – श्री. गिरीष शहा
एक महिन्यापूर्वी मी अबुधाबीला श्री स्वामीनारायण मंदिर पहायला गेलो होतो. तेथील व्यवस्था उत्तम होती. रोज १० ते २० हजार यात्रेकरू दर्शन करायला येतात, तसेच तिकडे येऊन संस्कार आणि संस्कृती याविषयी ज्ञानवर्धन ंहोत होते. वास्तविक हेच ज्ञान आपल्याकडे पूर्वीपासून आहे. नालंदा आणि तक्षशीला विद्यापिठांतील पुस्तके, आपले वेद, योग, न्यायप्रणाली, गणित, आयुर्वेद हे सर्व आपल्या मंदिर संस्कृतीतून उगम पावले आहेत. भारतीय संस्कृतीत पूर्वीपासून हिंदूंची मंदिरे ही गुरुकुले होती. शिक्षणपद्धती होती. सध्या परिस्थिती काय आहे ? केवळ मंदिर आमचे आहे. त्याच्या आसपास असे काहीच नाही. यातून आपल्याला बाहेर पडावे लागेल. मंदिरामध्ये १६ पैकी १५ संस्कार करण्याची व्यवस्था पाहिजे. गर्भाधान संस्कारसारखे संस्कार मंदिरात झाला, तर येणारी पिढी राष्ट्रप्रेमी निर्माण होईल, असे समस्त मुंबई येथील समस्त महाजन संघाचे अध्यक्ष श्री. गिरीष शहा यांनी म्हटले.
मंदिरांचे रक्षण हे प्रत्येक हिंदूंचे सामूहिक दायित्व! – प.पू. रमेशगिरी महाराज, कोपरगांव
सद्यस्थितीत मठ, मंदिरे, देवस्थान यांचे सुयोग्य व्यवस्थापन आणि त्यांचे सवंर्धन यांसाठी महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद आयोजित करण्यात आली आहे. सनातन संस्थाही यासाठी कार्यरत आहे. समस्त हिंदूंनी स्वत: पुरता विचार सोडून दिला पाहिजे. मंदिरे हे हिंदूंची सामूहिक उपासना केंद्रे आहेत. भजन, नामजप, प्रार्थना यांद्वारे मंदिरांतून सामूहिक उपासना केली जाते. अशा मंदिरांचे भंजन होणे हा हिंदु धर्मांवरील घाला आहे. त्यामुळे मंदिरांच्या रक्षणासाठी सर्व हिंदूंनी एकत्र येऊन सनातन संस्कृतीचा ध्वज फडकवायला हवा, असे आवाहन श्रीक्षेत्र बेट कोपरगांव येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज समाधी मंदिराचे पू. रमेशगिरी महाराज यांनी या वेळी केले.
या प्रंसगी मंदिर अभ्यासक श्री. संदीप सिंह म्हणाले, ‘‘मंदिर हे उत्पन्न मिळवण्याचे साधन नाही, तर भक्तीचे केंद्र आहे, हे समजणे आवश्यक आहे. मंदिर आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. जगभरात अनेक औद्योगिक शहरे आता लयाला जात आहेत; याऊलट भारतात उज्जैन, पाटलीपूत्र, रामेश्वरम्, काशी अशी तीर्थक्षेत्रे असलेली शहरे हजारो वर्षांपासून जीवंत आहेत; कारण ती सर्व मंदिरांच्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून होती. या देशाची अर्थव्यवस्था मंदिरांमुळे उभी आहे.’’
धर्मशिक्षणासह धर्मरक्षणाचीही भूमिका मंदिरांनी घ्यावी !- सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था
मंदिरांच्या माध्यमातून हिंदु समाजाचे जन्महिंदुपासून कर्महिंदुमध्ये रूपांतर करण्याचे महत्कार्य होते. मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशीला आहेत. त्यामुळे धर्मरक्षणाच्या संदर्भात मंदिरांमधून त्यांच्या त्यांच्या क्षमतेनुसार काही कृती होणे अपेक्षित आहे. ही आधारशीला खर्या अर्थाने तेव्हाच ठरेल, जेव्हा मंदिरांमधून धर्मरक्षणाच्या संदर्भात ठोस भूमिका घेतली जाईल आणि प्रबोधन केले जाईल. यापुढील काळात मंदिरांना धर्मशिक्षणाचे केंद्र बनवायचे असेल, तर धर्मशिक्षणाच्या जोडीला धर्मरक्षणाचीही भूमिका घेण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांनी या वेळी केले.
उपस्थित प्रमुख मान्यवर – मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सारवकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर, शिर्डी मतदारसंघाचे खासदार श्री. भाऊसाहेब वाघचौरे, श्री ज्योतिर्लिंग भीमाशंकर देवस्थानचे अधिवक्ता सुरेश कौदरे, माजी धर्मादाय आयुक्त श्री. दिलीप देशमुख, ओझर येथील श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट’चे उपाध्यक्ष श्री. तुषार कवडे, व्यवस्थापक श्री. अशोक देवराम घेगडे, जेजुरीचे विश्वस्त श्री. राजेंद्र खेडे, पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपतीच्या सौ. संगिताताई ठकार आणि रांजणगावचे विश्वस्त श्री. तुषार पाटील
या प्रसंगी शिर्डी मतदारसंघाचे खासदार श्री. भाऊसाहेब वाघचौरे म्हणाले, ‘‘गेल्या काही वर्षात मी ५५० हून अधिक मंदिरांचा जीर्णाेद्धार केला असून यापुढील काळात अन्यही मंदिरांचा जीर्णाेद्धार करण्याचे ठरवले आहे.’’
परिषदेतील विशेष घडामोडी : शिर्डीजवळील पुणतांबा येथे श्री महादेव मंदिरात मूर्तीची विटंबना झाली आहे. या घटनेचा मंदिर परिषदेत निषेध करून आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी एकमुखाने राज्य सरकारकडे करण्यात आली.