रिपोटर चेतन सरोदे /प्रभाकर सरोदे
अल्पवयीन मुलीचं सिनेस्टाईल अपहरण; सामूहिक अत्याचार करुन हत्या; चौघे पोलिसांच्या ताब्यात
लग्न समारंभासाठी आलेल्या १२ वर्षीय मुलीचं अपहरण करुन तिची दगडाने ठेचून हत्या केल्याची खळबळजनक घटना गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात घडली होती. आरोपींनी पीडितेवर सामूहिक अत्याचार केल्याचंही समोर आलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत ४ चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे. चारही अल्पवयीन देवरी तालुक्याच्या चिल्हाटी गावातील रहिवासी आहेत. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी आपला गुन्हा कबूल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून चारही अल्पवयीन मुलांची नागपूर येथील बाल सुधार गृहात रवानगी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १९ एप्रिलला पीडित मुलगी आपल्या बहिणी सोबत देवरी तालुक्यातील चिचगड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गोटाणपार गावात लग्न समारंभात आली होती. यावेळी पीडित मुलीच्या मित्रानेच तिला आपल्या दुचाकीवर बसवून वडेकसा जंगलात नेलं. तिथे त्याने आपल्या तीन मित्रांसोबत मिळून पीडितेवर सामूहिक अत्याचार केला. अत्याचारानंतर आरोपींनी दगडाने ठेचून पीडितेची हत्या केली. दरम्यान, मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने पीडितेच्या कुटुंबियांनी तिचा शोध घेतला. २० एप्रिलला सकाळी पीडितेचा मृतदेह गावकऱ्यांना जंगलात आढळून आला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनेचा तपास केला असता, पीडितेवर सामूहिक अत्याचार झाल्याचं उघड झालं. या गुन्ह्याचा छडा लावण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं होतं. घटनास्थळी कुठलाही पुरावा नसूनही पोलिसांनी मोठ्या शिताफीने या प्रकरणाचा तपास केला. पोलिसांनी पीडितेचा मोबाइल चेक केला असता, अल्पवयीन मुलांनी तिच्यासोबत चँटिंग केल्याचं समोर आलं. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, चारही अल्पवयीन मुलांनी आपला गुन्हा कबूल केला आहे.

















Leave a Reply