रिपोटर चेतन सरोदे / प्रभाकर सरोदे
भडगाव तालुक्यातील मळगाव गावात सध्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा ८ ते ९ दिवसाआड होत आहे
. पाझर तलाव कोरडा झाला असुन पाणी पुरवठा करणारी विहीरही पाण्याचा तळ गाठत कोरडी झाली आहे. यापुढे गावाला पाणी पुरवठा कसा करावा असा गंभीर प्रश्न ग्रामपंचायत प्रशासनासमोर उभा आहे. मळगावासाठी पिण्याचे टँकर तात्काळ सुरु करावे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा. या मागणीचा प्रस्ताव मळगाव ग्रामपंचायतीमार्फत भडगाव पंचायत समिती प्रशासनाला नुकतेच देण्यात आला आहे. तरी प्रशासनामार्फत मळगाव गावासाठी तात्काळ पिण्याचे पाण्यासाठी टँकर सुरु करावे. पिण्याच्या पाण्याचा मुख्य प्रश्न मार्गी लावावा. तात्काळ दखल घ्यावी. अशी मागणी सरपंच शोभाबाई रामकृष्ण पाटील, उपसरपंच ऊषाबाई प्रताप परदेशी यांचेसह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, ग्रामस्थ, महिला वर्गातुन होतांना दिसत आहे. तसेच मळगाव गावासाठी नविन जलजिवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना मंजुर असुन तब्बल २ वर्ष उल्टुनही काम सुरु न होता ही योजना कागदावरच फिरत आहे. अदयापही या पाणी पुरवठा योजनेचे भिजत घोंगडे पडलेले आहे. गिरणा नदी काठावर पाणी पुरवठा विहीरीसाठी मंजुरीचे पञही जिल्हाधिकार्यांनी दिलेले आहे. माञ याकडे प्रशासनाचेच सोयीस्कर दुर्लक्ष झाले आहे. आता तरी या नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु होईल का? असा संतप्त प्रश्न ग्रामस्थांतुन होतांना दिसत आहे. याबाबत माहिती अशी कि, तालुक्यातील मळगाव हे तालुक्याच्या सिमेवरचे छोटेसे गाव पण शासनाच्या योजना लाभापासुन कोसो दुर असलेले हे गाव आहे. हे गाव अवर्षण प्रवर्षण क्षेञात येते. डोंगराळ भाग व बरड भाग असेलेली कोरडवाहु जमीन आहे. शेती सिंचनासह जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, नागरीकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सारे दरवर्षी निसर्गावरच अवलंबुन असते. मळगाव परीसरात ३ पाझर तलाव आहेत. माञ यावर्षीही पाऊसाळा कमी प्रमाणात झाल्याने हे पाझर तलाव पाण्याने पुर्णपणे भरले नाहीत. मळगाव गावासाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा १.५ कि, मी. अंतरावर असलेल्या तांदुळवाडी पाझर तलावातुन केला जातो. या तांदुळवाडी पाझंर तलावा जवळच मळगावला पाणी पुरवठा करणारी विहीर आहे. पाऊसाळा यावर्षी कमी प्रमाणात झाल्याने पाझर तलावात जेमतेम पाणी साठा शिल्लक राहीला. हा तांदुळवाडी पाझर तलाव कोरडा बनला असुन पाणी पुरवठा करणारी विहीरही पाण्याने तळ गाठत कोरडीठाक बनल्याचे चिञ आहे. सध्या मळगाव गावासाठी तब्बल ८ ते ९ दिवसाआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा कसाबसा केला जात आहे. नळांना १० ते १५ मिनीटे जवळपास पाणी मिळत आहे. त्यामुळे सध्या पिण्याच्या पाण्याची तिव्र टंचाई व उग्र रुप धारण होतांना दिसत आहे. नळांना पाणी आल्यावर नागरीकांसह महिलांची मोठी धावपळ होतांना दिसते. जनावरांचे पिण्याच्या पाण्याचे मोठे हाल होतांना दिसत आहे. शेतातील सर्व सिंचन विहीरी या रणरणत्या उन्हात कोरडयाठाक बनल्या आहेत. गावात ४ ते ५ पाण्याचे आड, छोटया विहीरी आहेत. या विहीरीही कोरडयाठाक बनल्याचे चिञ आहे. पाण्याचे दुसरीकडे कुठेही स्ञोत नाही.मळगाव गावाला पाणी पुरवठा करणारी विहीरच कोरडी पडली आहे. पाझर तलावात पाण्याचा ठणठणाट बनत पाझर तलावही कोरडा झालेला आहे. ८ ते १० दिवसानंतर मळगावाला होणारा पाणी पुरवठाच पाण्याअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहे.