Advertisement

अखेर महापालिकेकडून मुख्य नाले सफाईला निघाला मुहूर्त; मुख्य नाल्यामधून एकाच दिवसात निघाला ३० टन गाळ

प्रतिनिधी सुधीर गोखले

आगामी मान्सून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पाणी साचून नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्रशासनाने गतिमान पावले उचलली आहेत. आणि अखेर बहुचर्चित नालेसफाई ला मुहूर्त आज मिळाला. नालेसफाईची निविदा (टेंडर) प्रक्रिया पूर्ण होण्यास तांत्रिक कारणांमुळे विलंब लागत असल्याचे गांभीर्य ओळखून, महापालिका आयुक्त संजीता महापात्र यांनी महापालिकेच्या स्वतःच्या यंत्रणेमार्फत  तातडीने मुख्य नाले स्वच्छ करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार आरोग्य व स्वच्छता विभागाच्या उपायुक्त स्मृती पाटील यांनी स्वतः शामराव नगर परिसर आणि कुपवाड येथील चैत्रबन नाला स्वच्छता मोहिमेचे नेतृत्व केले. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून नाल्यांमधील साठलेला गाळ आणि कचरा काढून पाण्याचा प्रवाह मोकळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी शामराव नगर च्या मुख्य नाल्यातून २० टन गाळ काढण्यात आला.तर कुपवाडच्या चैत्रबन नाल्यामधून १० टन गाळ काढण्यात आल्याचे उपायुक्त स्मृती पाटील यांनी सांगितले. अशा प्रकारे पहिल्याच दिवशी दोन्ही मुख्य नाल्यांमधून एकूण ३० टन गाळ काढून पाण्याचा निचरा होण्याचा मार्ग सुलभ करण्यात आला आहे. पावसाळ्यात नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरू नये आणि जनजीवन विस्कळीत होऊ नये, हा प्रशासनाचा मुख्य उद्देश आहे. कामाची निकड आणि वेळेचे गांभीर्य लक्षात घेऊन शनिवार आणि रविवार या सुट्ट्यांच्या दिवशीही ही नालेसफाई मोहीम पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.शहरातील सर्व मुख्य नाल्यांची स्वच्छता करून ते रुंद आणि खोल करण्यावर प्रशासनाचा भर असून, नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!