धरणगाव : धरणगावात दोन सख्ख्या बहिणींवर दोनवेळा; पोलिसांनी नराधमास केले जेरबंद..!
धरणगाव : चोपडा तालुक्यातील अत्याचाराची घटना ताजी असतानाच, धरणगाव येथेही अत्याचाराची एक गंभीर घटना समोर आली आहे. दोन सख्ख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप असलेला संशयित आरोपी विनोद बारेला याच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (POCSO) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक पोलिसांनी त्वरीत कारवाई करत आरोपीला अटक केली असून, सध्या तो गजाआड आहे. या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मध्य प्रदेशातील एक कुटुंब धरणगावात वास्तव्याला आहे. या परिसरात संशयित आरोपी विनोद बारेला हा देखील राहतो. १० सप्टेंबर ते ११ सप्टेंबरच्या दरम्यान या नराधमाने दोन्ही अल्पवयीन सख्ख्या बहिणींवर दोन वेळा अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या अमानुष कृत्यानंतर आरोपीने पीडित मुलींना घरात कुणाला सांगितले तर दोघांनाही मारून टाकण्याची धमकी दिली होती. यामुळे पीडित मुली भयभीत होऊन काही दिवसांपर्यंत याबाबत कोणाशीही बोलल्या नाहीत.
अखेर पीडित मुलींनी धीर धरून हा प्रकार आपल्या आईला सांगितला. आईने तात्काळ धरणगाव पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि संशयित आरोपी विनोद बारेला याच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पीडित मुलींची फिर्याद घेऊन आरोपी विनोद बारेला याच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.