जळगांव : ईडीच्या नावाने धमकी; १५ लाखात गंडवल…
जळगांव : सायबर क्राईमचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. फसवणूक करण्याचे वेगवेगळे प्रकार समोर येत असून आता थेट ईडीच्या नावाने धमकावत सायबर गुन्हेगारांनी एका अभियंत्याची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. यात तब्बल १५ लाख रुपयात फसवणूक केली. याबाबत सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. भुसावळ शहरातील ५० वर्षीय अभियंत्याच्या मोबाईलवर २६ जूनला अज्ञात व्यक्तीचा फोन आला. बीएसएनएल कार्यालयातून बोलत असून, तुमचा फोन दोन तासांत बंद होईल, असे सांगण्यात आले. त्याचे कारण विचारले असता, तुम्ही मोबाईल क्रमांकावरून गैरप्रकार केला असून, याबाबत मुंबईत तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे, असे सांगण्यात आले. त्यानंतर सकाळी दहाच्या सुमारास त्यांना दुसरा फोन आला. यावेळी टिळकनगर ठाण्याचा पोलिस निरीक्षक विनायक बाबर बोलत असून, ईडी ऑफिसमध्ये तक्रार दाखल झाली आहे. तुम्हाला अटक करावी लागेल’, अशी भीती घातली. या दरम्यान समोरच्यानी ईडीच्या सही शिक्क्यानिशी पत्र पाठविले. तसेच वरिष्ठ अधिकारीसोबत कॉन्फरन्समध्ये घेण्याची बतावणी केली. तुमच्या नावाचे पकड वॉरंट असून, हा प्रकार थांबवायचा असेल, तर तुम्हाला तर रक्कम भरावी लागेल, असा दम भरला. निरीक्षक विनायक बाबर नामक व्यक्तीने त्याचे बंधन बँकेचे खाते क्रमांक पाठवले. यानंतर दुपारी पुन्हा फोन करत बँकेत जाऊन पैसे भरा. नाही तर तुम्हाला अटक होईल; असे सांगितले. त्यानुसार अभियंत्यांनी भीतीपोटी त्यांच्या कॉसमॉस बँकेच्या खात्यातून बंधन बँकेच्या खात्यात १५ लाख रुपये आरटीजीएसमार्फत भरले. मित्र, कुटुंब आणि नातेवाइकांनी फसवणूक झाल्याचे निदर्शनास आणून दिले. यानंतर त्यांनी २७ जूनला सायबर पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली. त्यावरून गुन्हा दाखल झाला आहे.