Advertisement

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या लवकर मार्गी लावाव्यात: मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मराठा क्रांती मोर्चा उपसमितिने दिले निवेदन

प्रतिनिधी सुधीर गोखले

मराठा क्रांती मोर्चाची उपसमितीकडे मागणी; नियुक्त्या, सेवालाभ, शैक्षणिक सवलती आणि महामंडळाच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याची मागणी….
मराठा आरक्षणाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांवर तातडीने ठोस निर्णय घेण्याची मागणी करत मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना सविस्तर निवेदन सादर केले.निवेदनात समांतर आरक्षणातील प्रलंबित नियुक्त्या, SEBC प्रवर्गातील अधिसंख्य पदांवरील उमेदवारांना सेवाविषयक लाभ, शैक्षणिक सवलतींची प्रभावी अंमलबजावणी तसेच कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यांच्या विविध अडचणी तातडीने सोडविण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, पोलीस उपनिरीक्षक पदासाठी सारिका भोसले व इतर उमेदवारांना न्याय देण्याबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. याशिवाय, अधिसंख्य पदांवर नियुक्ती झालेल्या मराठा तरुण-तरुणींना सेवाज्येष्ठता आणि इतर सेवाविषयक लाभ लागू करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना व्याज परतावा, LOI संदर्भातील अडचणी, वाढीव निधी मंजूर करणे आणि शैक्षणिक कर्ज योजनांबाबतही शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यासोबतच, शासनाने जाहीर केलेल्या मराठा समाजासाठीच्या शैक्षणिक सवलतींची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व शैक्षणिक संस्थांना स्पष्ट निर्देश द्यावेत आणि नियमांचे पालन न करणाऱ्या संस्थांवर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली.
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने विलास देसाई, आबासाहेब आप्पासाहेब शिंदे-म्हैशाळकर,तानाजी भोसले, कैलास पाटील,डॉक्टर संजय पाटील, राहुल पाटील, सुरेश शिंदे, सागर जाधव, शंकर शिंदे, बाळासाहेब पाटील , विजय धुमाळ, अक्षय मिसाळ, मदन तांबडे, मयूर दाणेकर, अक्षय भोसले,अशोक पाटील, दिलीप पाटील, नितीन बाबर, विनोद शिंदे, महेश वारके, अमर पाटील ,संतोष निकम यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या निवेदनावर स्वाक्षऱ्या करून शासनाने केवळ आढावा न घेता ठोस निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!