Advertisement

मिरजेतील शासकीय वैद्यकीय रुग्णालयाची आरोग्यगाथा; वर्षांमध्ये तब्बल ४ हजाराहून अधिक मोफत नेत्र शस्त्रक्रिया; वैद्यकीय अधीक्षक डॉ. रुपेशकुमार शिंदे यांची माहिती

प्रतिनिधी सुधीर गोखले
 “दृष्टी हीच जीवनाची खरी संपत्ती” या भावनेतून आज तागायत मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा नेत्ररोग विभाग अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर दर्जेदार आणि मोफत नेत्रसेवा देत असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ प्रकाश गुरव आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ रुपेशकुमार शिंदे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली. ते म्हणाले पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दिलेल्या व राज्य शासनाकडून मिळालेल्या भरीव अनुदानामुळे रूग्णालयात मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, अद्ययावत यंत्रसामग्री उपलब्ध झाली आहे. याच्या जोडीला अनुभवी तज्ञ डॉक्टरांच्या सेवेमुळे या रूग्णालयात मोती बिंदूपासून ते रेटिनाच्या गुंतागुंतीच्या आजारांपर्यंत सर्व प्रकारचे उपचार आणि शस्त्रक्रिया आता अधिक सुरक्षित, अचूक आणि जलद होत आहेत. या सुविधांचा लाभ देत गेल्या वर्षभरात तब्बल ४ हजार रुग्णांवर मोफत नेत्रशस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत. डॉ रुपेशकुमार शिंदे यांनी याबाबत अधिक माहिती दिली ती म्हणजे ग्रामीण भागातील रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या स्मॉल इन्सिजन कॅटरॅक्ट सर्जरी (SICS) या पद्धतीने ३ हजार रुग्णांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली. तर अत्याधुनिक फेको इमल्सिफिकेशन तंत्रज्ञानाद्वारे १ हजार ९१० रुग्णांवर उपचार करण्यात आले. या दोन्ही पद्धतींमुळे रुग्णांना कमी वेदना, जलद उपचार आणि लवकर दृष्टी पुनर्प्राप्त होण्याचा लाभ मिळत आहे.नेत्ररोग विभागात मधुमेह, उच्च रक्तदाब आणि काचबिंदूमुळे होणाऱ्या दृष्टीच्या गंभीर समस्या वेळेवर ओळखून त्यावर तत्काळ उपचार केले जातात. फंडस कॅमेरा, नॉन-कॉन्टॅक्ट टोनोमीटर आणि पेरिमेटरी यांसारख्या अत्याधुनिक उपकरणांद्वारे डोळ्याच्या पडद्यावरील आजारांचे अचूक निदान करून अनेक रुग्णांची दृष्टी वाचविण्यात यश मिळत आहे. बालरुग्णांसाठीही विभागात विशेष सुविधा उपलब्ध आहेत. तिरळेपणा, नवजात अर्भकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी (ROP), तसेच डोळ्यांच्या जन्मजात विकारांवर उपचार व शस्त्रक्रिया केल्या जातात. याशिवाय डोळ्यावरील गाठी, कर्करोगजन्य वाढ, बुबुळ प्रत्यारोपण, रेटिनावरील शस्त्रक्रिया तसेच सर्व वयोगटातील रुग्णांसाठी संगणकीकृत चष्मा तपासणी आणि उपचाराची सुविधा उपलब्ध आहे.नेत्रविभागातील मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि झाईस मायक्रोस्कोप, सेंच्युरियन अल्कॉन फेको मशीन, प्रिसाईस फेको मशीन, अप्पास्वामी फेको विथ व्हिट्रेक्टॉमी यांसारख्या अत्याधुनिक उपकरणांमुळे गुंतागुंतीच्या नेत्रशस्त्रक्रियाही यशस्वीपणे केल्या जात आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या आधुनिक नेत्रसेवा आता सर्वसामान्य नागरिकांना पूर्णपणे मोफत शासकीय रुग्णालयात मिळत आहेत. एकूणच मिरज शासकीय रूग्णालयाच्या आधुनिक नेत्रसेवेने हजारोंची आयुष्ये उजळली आहेत.याबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरजचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव म्हणाले, नियोजन समिती आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या माध्यमातून नेत्रविभागात अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध झाली आहे. त्यामुळे रुग्णांना अधिक सुरक्षित, अचूक आणि दर्जेदार उपचार देणे शक्य झाले असून, नागरिकांचा शासकीय आरोग्यसेवेवरील विश्वास अधिक दृढ होत आहे.”रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रूपेश शिंदे म्हणाले, शासकीय वैद्यकीय रूग्णालयात कॅटरॅक्ट, फेको, कॉर्निया प्रत्यारोपण, तिरळेपणा अशा विविध सर्जरी होतात. ज्या आरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत केल्या जातात. गेल्या वर्षभरात 4 हजार पेक्षा जास्त डोळ्याच्या सर्जरी झाल्या आहेत. अद्ययावत यंत्रसामुग्री उपलब्ध झाल्याने डोळ्याच्या सर्व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करणे शक्य झाले आहे.या अद्ययावत उपचार पद्धतीचा लाभ सांगली जिल्ह्याच्या आसपासच्या जिल्ह्यांना व कर्नाटकमधील रूग्णांनाही होत आहे. अथनी तालुक्यातील बालगिरी येथील शिवार्थ संदीप तलवार या 15 महिन्यांच्या बालकावर तिरळेपणा दृष्टी सुधारण्याची शस्त्रक्रिया झाली असून, याबाबत त्याचे वडील संदीप तलवार म्हणाले, मिरज सिव्हील रूग्णालयामध्ये अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध झाल्याने माझ्या मुलाचे तिरळेपणाचे squint (स्क्वींट) आपरेशन सिव्हील मध्ये अत्यंत चांगले व मोफत झाले. याबाबत त्यांनी सिव्हील हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर व तसेच अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध करून दिल्याने शासनाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!