Advertisement

म्हैसाळ योजनेचे सर्व पंप सुरू होणार; क्षमतावाढीसाठी आठ दिवसांत अहवाल – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

प्रतिनिधी सुधीर गोखले

आयुर्मान संपलेल्या पंपांबाबत निर्णय; विस्तारित योजनेतून जत तालुक्यातील गावांना पाणी देण्याचे नियोजन

म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतील सर्व पंप सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले असून, आयुर्मान संपलेल्या पंपांची कार्यक्षमता वाढविणे किंवा त्यांची बदली करण्याबाबत आठ दिवसांत सविस्तर तांत्रिक अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.मिरज येथे म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची पाहणी केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. सुरेश (भाऊ) खाडे, आमदार गोपीचंद पडळकर, माजी खासदार संजय पाटील, ज्येष्ठ नेते दीपक बाबा शिंदे, रुग्ण सेवा प्रकल्प चे डॉ भालचंद्र साठे, विधीज्ञ अजिंक्य कुलकर्णी, राजेंद्र नागरगोजे, बेडगचे सरपंच उमेश पाटील आणि तानाजी पाटील उपस्थित होते. जलसंपदा मंत्री म्हणाले की, आमदार डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यांच्या मागणीनुसार म्हैसाळ योजना सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला १४ पंप कार्यान्वित करण्यात आले होते. आता योजनेतील सर्व पंप सुरू करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. यावर्षी पावसाअभावी आणि धरणांतील कमी पाणीसाठ्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र सध्या वारणा आणि कोयना धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध असून, या पाण्याच्या साहाय्याने तलाव आणि बंधारे भरण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, म्हैसाळ योजनेतील अनेक पंपांचे आयुर्मान संपले असल्याने त्यांची कार्यक्षमता वाढविणे किंवा नवीन पंप बसविण्याचा पर्याय तपासला जाणार आहे. यासंदर्भात तांत्रिक अधिकाऱ्यांना आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, त्यानंतर योजनेची क्षमता वाढविण्याबाबत निर्णय घेतला जाईल. यासोबतच विस्तारित म्हैसाळ योजनेद्वारे जत तालुक्यातील गावांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!