Advertisement

गोवंश हत्या करणाऱ्या व्यवसायिकांना पाठिशी घालणाऱ्या ‘त्या’ नेत्यावर कारवाई करा; मिरज सुधार समितीची मागणी

बेपारी गल्ली, मोमीन गल्ली परिसरातील घरोघरी अनधिकृत कत्तलखाने बंद करा

सांगली; प्रतिनिधी सुधीर गोखले

शहरातील मध्यवर्ती भागात मोठी लोकवस्ती असलेले बेपारी गल्ली, मोमीन गल्ली मधील खुलेआम गोवंश हत्या करुन कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या समाजकंटकांवर पोलिसांनी कारवाई केली. बोकड चौक परिसरातील एका नेत्याच्या वरद हस्तामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरे आणण्याचे धाडस व्यवसायिकांनी केल्याची माहिती समोर आली आहे. म्हणून पोलिसांनी त्या नेत्याचा शोध घेऊन त्याच्यावर सुध्दा कारवाई करावी तसेच, शहरातील मध्यवर्ती लोकवस्तीतील बेपारी गल्ली, मोमीन गल्लीत घरोघरी अनधिकृत कत्तलखाने बंद करण्याची मागणी मिरज सुधार समितीने केली आहे. शुक्रवारी मिरज सुधार समितीचे अॅड. ए. ए. काझी, अध्यक्ष नरेश सातपुते, उपाध्यक्ष तौफिक देवगिरी, कार्यवाह वसीम सय्यद, सुरेश झेंडे, दिनेश तामगावे, अमीर डांगे आदी सदस्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण चौगले, महापालिका उपायुक्त स्मृती पाटील, सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, बुधवारी मिरज शहर पोलिसांनी बेपारी गल्ली, मोमीन गल्लीत तब्बल ३७ गोवंश जनावरे व वासरु आणि सुमारे १५ गोवंश जनावरांचे तब्बल १४०० किलो गोमांस जप्त करत चार आरोपींना गजाआड केले. बोकूड चौकातील एका राजकीय नेत्याच्या वरदस्तामुुळे बेपारी व्यवसायिक मोठ्या प्रमाणात गोवंश हत्या करुन मिरज शहरातील कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देत आहेत. हे शहराची शांतता अबाधित राखण्यासाठी योग्य नाही. मोठ्या जनावरांची कत्तलीसाठी मिरज-बेडग रोडवर कत्तलखाना असतानाही तेथे कत्तली न करता मध्यवर्ती दाट लोकवस्तीत बेपारी गल्ली, मोमीन गल्लीत घरोघरी अनधिकृत कत्तलखाने तयार करुन मोठ्या जनावरांच्या कत्तली केल्या जातात. या मोठ्या जनावरांच्या टाकाऊ अवयव, रक्त महापालिकेच्या ड्रेनेजलाईनमध्ये सोडले जाते. यातून लक्ष्मी मार्केट परिसरात वारंवार ड्रेनेज तुंबून दुर्गंधी पसरते. मात्र,याकडे महापालिका आरोग्य विभाग किंवा जलनिस्सारण विभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बेपारी गल्ली, मोमीन गल्ली परिसरात मोठ्या जनावरांच्या कत्तलीसाठी घरोघरी तयार करण्यात आलेले अनधिकृत कत्तलखाने बंद करण्याबाबत तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी मिरज सुधार समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!