Advertisement

आज श्री शनैश्वर जयंती … सांगलीकर मळा परिसरातील बकुळबाग येथील शनिमारुती नवग्रह काळभैरव मंदिर म्हणजे निसर्गरम्य सुखशांतीचा आणि पवित्रतेचा अलौकिक अनुभव..

प्रतिनिधी सुधीर गोखले

मिरजेच्या सांगलीकर मळ्यातील गणपती देवळाजवळ बकुळबाग परिसरात असणाऱ्या या देवळाच्या प्रांगणाचे खूप सुंदर असे सुशोभीकरण करण्यात आले असून श्री शनैश्वर जयंती निमित्ताने या मंदिर आणि परिसराचे विकसक किशोर पटवर्धन यांच्या भेटीचा योग आला आणि त्यांच्याकडून या मंदिराच्या निर्मिती बाबतीतली काही रोचक माहिती मिळाली..
बकुळबागची ही जागा निम्मी श्री डोंगरेमाळी यांच्या मालकीची आणि निम्मी ब्राह्मणपुरी येथील संभा तालमी जवळच्या महाजन कुटुंबीयांच्या मालकीची.. या महाजनांनी सुमारे ५०/६० वर्षांपूर्वी मिरज सोडले असल्यामुळे त्यांना शोधणे हे एक आव्हान होते, त्याकाळी हे महाजन नोकरीनिमित्त हजारो कंत्राटी कामगार घेऊन इराणला गेलेत असेही कळले पण मारुतीकृपेने महाजनांची भेट झाली आणि पटवर्धनांच्या सगळ्या व्यवहारिक गोष्टी सुकर झाल्या..
या महाजनांच्या जागेमध्ये पूर्वी एक विहीर होती आणि या विहिरीमध्ये हनुमानाचे मंदिर होते आणि बाजूलाच विशाल असा एक पिंपळवृक्ष होता..
बकुळ बागच्या डेव्हलपमेंटच्या रेखांकनानुसार तेथील विहीर खुल्या जागेत येत असल्यामुळे ती बुजवावी लागणार होती आणि पिंपळ देखील रस्त्यात मध्यावर येत असल्यामुळे काढून टाकावा लागणार होता..
नाईलाजास्तव हे बदल करावे लागणार असल्यामुळे येथील डोंगरेमाळी यांच्या जागेमध्ये एक भव्य असे शनीमारुती मंदिर बांधण्याचा संकल्प पटवर्धन यांनी केला, देवळाची पायाभरणी केली आणि मगच विधिवतपणे आवश्यक ते बदल करून येथील डेव्हलपमेंट करण्यात आली.. लगोलग पुढच्या वर्षी सन २०१२ साली प.पू. झेंडे महाराज आणि प.पु. केळकर महाराज यांच्या शुभहस्ते या मंदिराचे कलशारोहण करून या मंदिराची आणि परिसराची उभारणी पूर्ण झाली..
स्थापनेच्या वर्षीच या मंदिराच्या प्रांगणामध्ये सर्व नक्षत्रांचे २७ विविध वृक्ष लावण्यात आले होते त्यामुळे आज या ठिकाणी  अतिशय सुंदर आणि मोठेच्या मोठे नक्षत्रबन निर्माण झाले आहे.. येथे दुर्मिळ असा रुद्राक्षवृक्ष देखील आहे. या ठिकाणी श्री.शनि शिंगणापूर येथील शनी शिळेची प्रतिकृती असून पूर्वीच्या महाजनांच्या देवळातील मारुती आता येथे पिंपळाखाली  स्थापित केला आहे..
या मंदिरातील श्रींच्या सर्व मुर्त्या अतिशय रेखीव आणि सुंदर कलाकुसर असलेल्या असून त्या  कर्नाटकातील हम्पी येथील एका प्रसिद्ध अशा शिल्पकाराने बनवलेल्या आहेत.. हे सगळं प्रांगण पाहिलं की किशोर पटवर्धनांच्या सौंदर्यदृष्टीचा प्रत्यय येतो..
येथील विशाल पिंपळवृक्षास पारकट्टा बांधलेला असून येथील नक्षत्रबनाच्या छायेत शांतचित्ताने बसून नामजप करणे म्हणजे परमानंद.. अगदी ब्रह्मानंदी टाळी लागल्यासारखे होते..

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!