सत्यार्थ न्युज प्रतिनिधी – किरण माळी (जळगांव, महाराष्ट्र )
ग्रामीण शिक्षणाला विज्ञानाची जोड आवश्यक – मंत्री गुलाबराव पाटील
धरणगाव/जळगाव, दि. 23 डिसेंबर : ग्रामीण भागातील शाळांना टिकाव लागण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण, विज्ञान व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि शिक्षक-पालक संवादाला महत्त्व दिले पाहिजे. ग्रामीण भागातील विद्यार्थीही कोणत्याही क्षेत्रात मागे राहू नये यासाठी ग्रामीण शिक्षणाला विज्ञानाची जोड आवश्यक असल्याचे प्रतिादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते पथराड येथील बापूसाहेब आर. डी. पाटील माध्यमिक विद्यालयात आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन व उल्हास मेळाव्यात बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्व. शिवचंदभाऊ शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव अजय पाटील होते.
यावेळी विज्ञान प्रदर्शनाचे व उल्हास मेळाव्याचे उद्घाटन मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी गट शिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी मंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य नागरी सत्कार शिक्षण विभाग व पथराड विद्यालयाच्या वतीने करण्यात आला.
तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांनी प्रदर्शनात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. उत्कृष्ट यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचा ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
विज्ञान प्रदर्शनात विजेते असे प्राथमिक गट –प्रथम – स्नेहा सोमवंशी व धनश्री शिंदे,(बापूसाहेब आर. डी. पाटील माध्यमिक विद्यालय पथराड), द्वितीय – महेश पाटील (जि. प.शाळा, वराड) तृतीय – रोहित कोळी (जि. प. प्र. चां. शाळा, बांभोरी)
माध्यमिक गटात प्रथम – आदित्य देवेंद्र पाटील (सा. दा. कुडे विद्यालय धरणगाव), द्वितीय – देवेंद्र अशोक पाटील (अंजली ग्रुप माध्यमिक विद्यालय), तृतीय – खुश राजेंद्र पवार. (पी. आर. हायस्कूल, धरणगाव)
यांची होती प्रमुख उपस्थिती
कार्यक्रमास माजी पंचायत समिती सभापती मुकुंदराव नन्नवरे, गट विकास अधिकारी अजितसिंग पवार, डी. एस. पाटील, पथराड बु. चे सरपंच उत्तम सोनवणे, पथराड खुर्दच्या सरपंच मंजुळाताई चव्हाण, नवल पाटील, बुधाबापू लंके, दीपक माळी, रवींद्र चव्हाण, प्रभाकर पाटील, वाय. पी. पाटील, दीपक सोनवणे, पंकज साळुंखे व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती राणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन केंद्रप्रमुख प्रमोद सोनवणे यांनी मानले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी पथराड विद्यालय व तालुका विज्ञान निवड समितीतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.