पुणे : जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आल्याने मल्लाचा दुदैवी मृत्यू
पुणे : जिममध्ये व्यायाम करत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने कुमार महाराष्ट्र केसरी असणारा पैलवान विक्रम शिवाजीराव पारखी (वय ३०) याचा जागेवरच मृत्यू झाला. पैलवान पारखी यांचा १२ डिसेंबर रोजी विवाह होणार होता. विक्रमच्या अकाली निधनाने पुणे कुस्ती क्षेत्रासह मुळशी तालुक्यात शोककळा पसरली आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे जिममध्येही खळबळ उडाली. नक्की काय झाले आहे हेच कोणाला त्यावेळी समजले नाही.
विक्रम पारखी मुळशी तालुक्यतिल मन गावत असनाऱ्या एका खाजगी जिममध्ये ते व्यायाम करण्यासाठी गेले होते. मात्र व्यायाम करत असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर ते तिथेच खाली कोसळले. त्यांना तत्काळ पिंपरी चिंचवड येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यावेळी दवाखान्यात घेवून गेलेल्यांना धक्का बसला. बोलता चालता माणून गेल्याने ते हादरून गेले.
कुमार महाराष्ट्र केसरी, ब्राँझ पदक, आदर्श व गुणी खेळाडू असे अनेक किताब पटकावलेल्या पैलवानाच्या अचानक जाण्याने सर्व मुळशी तालुक्यावर शोककळा पसरली आहे. २८ नोव्हेंबर २०१४ रोजी वारजे येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आयोजित “महाराष्ट्र राज्य कुमार अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा २०१४” झाली होती. त्यात विक्रम याने अजिंक्यपद मिळवले. विक्रम याने अनेक राष्ट्रीय पदके व किताब मिळवले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील कुस्ती स्पर्धेत सहभाग घेतला होता. अनेक पदके व किताब आपल्या नावावर करत विक्रम करणारा हा पैलवान युवा पैलवनांसाठी आदर्श होता. हिंदकेसरी पैलवान अमोल बुचडे यांच्याशी त्याचे गुरू-शिष्याचे नाते होते. विक्रमचे वडील शिवाजीराव पारखी हे निवृत्त सैनिक असून त्यांनी १९९९ च्या कारगिल युद्धात सहभाग घेतला होता. विक्रम यांच्या पश्चात आई, वडील, एक विवाहित भाऊ व एय्क बहीण असा परिवार आहे.