सत्यार्थ न्युज प्रतिनिधी – किरण माळी (जळगांव, महाराष्ट्र)
पुणे – लक्षावधी वारकरी आषाढी, कार्तिकीच्या निमित्ताने आळंदी येथे श्री विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होत असतांना अद्याप आळंदी, देहू, पंढरपूर येथील तीर्थक्षेत्रांना म्हणाव्या अशा सुविधा नाहीत. तरी ‘हरिद्वार’ आणि ‘ऋषिकेश’ या तीर्थक्षेत्रांच्या धर्तीवर श्रीक्षेत्र पंढरपूर, देहू, आळंदी, पैठण आदी तीर्थक्षेत्रे यांसह राज्यातील सर्व मंदिरे, तीर्थक्षेत्रे यांचा परिसर 100 टक्के ‘मद्य-मांस मुक्त’ करण्यात यावीत, पंढरपूर येथील चंद्रभागा अन् आळंदी येथील इंद्रायणी नदीत सांडपाणी सोडण्यास बंदी घालावी, हिंदूंची भूमी-मंदिरे बळकावणारा ‘वक्फ’ कायदा रहित करावा, जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कायक्रम अंमलबजावणी समितीच्या सहअध्यक्ष पदावरून शाम मानव यांची तात्काळ हकालपट्टी करावी, देशात समान नागरी कायदा आणि लोकसंख्या नियंत्रण कायदा करावा यांसह विविध मागण्यांसाठी मंगळवार, 26 नोव्हेंबर या दिवशी आळंदी येथे 18 व्या वारकरी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय वारकरी परिषद आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने होणारे हे अधिवेशन दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत श्री देविदास धर्मशाळा तथा वै. मामासाहेब दांडेकर स्मृती मंदिर, गोपाळपुरा, आळंदी येथे घेण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय वारकरी परिषेदेचे प्रवक्ता ह.भ.प. निवृत्ती महाराज हल्लाळीकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
या संदर्भात ह.भ.प. रामचंद्र महाराज पेनोरे म्हणाले, ‘‘गेली 17 वर्षे सातत्याने हे अधिवेशन घेण्यात येत असून वारकर्यांचे विविध प्रश्न सातत्याने मांडून ते सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा घेते. यंदाही वारकर्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे.’’ ह.भ.प. तुणतुणे महाराज म्हणाले, ‘‘हे अधिवेशन पू. अमृताश्रम स्वामी महाराज (दंडी स्वामी) यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असून या परिषदेसाठी देवगड संस्थानचे मठाधिपती आणि विश्व हिंदु परिषदचे केंद्रीय मार्गदर्शक श्रीमहंत भास्करगिरी महाराज, प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्कलकोटचे पीठासन धर्माधिकारी श्री. प्रसाद पंडित, वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह.भ.म. भावताचार्य केशव महाराज उखळीकर, पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी संस्थानचे विश्वस्त ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, पालघर हिंदू शक्तीपीठाचे हिंदूभूषण श्री. भारतानंद सरस्वती महाराज, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती आळंदीचे विश्वस्त ह.भ.प. निरंजननाथजी महाराज, ह.भ.प. भगवान महाराज कोकरे, हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी यांसह अन्य मान्यवर वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. तरी भाविक, सांप्रदायिक साधक यांनी मोठ्या संख्येने त्यासाठी उपस्थित रहावे, तसेच अधिक माहितीसाठी ह.भ.प. बापू महाराज रावकर – 9975572684 यावर संपर्क साधावा.