आता मिरजेचे शासकीय वैद्यकीय रुग्णालय झाले अत्याधुनिक यंत्रणेने सुसज्य; एमआरआय, सीटी स्कॅन सुविधांमुळे निदानाला मिळाली नवी दिशा; अधिष्ठाता डॉ प्रकाश गुरव
प्रतिनिधी सुधीर गोखले हजारहून अधिक रुग्णांच्या एमआरआय तपासण्या… १९ हजारांहून अधिक एमआरआय स्कॅन पूर्ण…५३ हजारांहून अधिक सीटी स्कॅन
आजाराचे अचूक निदान जितके जलद आणि अचूक, तितके उपचार अधिक प्रभावी ठरतात. राज्य शासन आणि पालकमंत्री ना.चंद्रकांत पाटील तसेच तत्कालिन पालकमंत्री आणि विद्यमान आमदार डॉ. सुरेश खाडे यांनी मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय बळकट करण्यासाठी निधी उपलब्ध करून देत पाठबळ दिले. त्यामुळे आज अत्याधुनिक थ्री-टेस्ला एमआरआय आणि १२८ स्लाईस अॅडव्हान्स सीटी स्कॅन यंत्रणांमुळे गोरगरीब, सर्वसामान्य रूग्णांसाठी मिरजेचे शासकीय वैद्यकीय रुग्णालय आधारवड ठरताना दिसत आहे. थ्री-टेस्ला एमआरआयमुळे निदानात अधिक अचूकता
जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उपलब्ध करून देण्यात आलेली हि अत्याधुनिक थ्री-टेस्ला एम.आर.आय मशीन ही पश्चिम महाराष्ट्रातील शासकीय क्षेत्रातील महत्त्वाची सुविधा ठरली आहे. १५ ऑगस्ट २०२४ पासून जून २०२६ पर्यंत या यंत्राद्वारे १३ हजार ५०० हून अधिक रुग्णांच्या एमआरआय तपासण्या करण्यात आल्या असून, १९ हजारांहून अधिक एमआरआय स्कॅन पूर्ण करण्यात आले आहेत. ही यंत्रणा उच्च क्षमतेची असल्याने शरीरातील सूक्ष्म बदलही स्पष्टपणे दिसून येऊ शकतात. मेंदू, मणका, हृदय, सांधे, स्नायू, रक्तवाहिन्या तसेच विविध अंतर्गत अवयवांशी संबंधित गुंतागुंतीच्या आजारांचे निदान अधिक अचूकतेने करता येते. त्यामुळे डॉक्टरांना योग्य उपचार पद्धती निश्चित करणे अधिक सोपे होते. १२८ स्लाईस सीटी स्कॅनमुळे आपत्कालिन उपचारांना गती
रूग्णालयात उपलब्ध असलेल्या १२८ स्लाईस अॅडव्हान्स सीटी स्कॅन मशीनमुळे अपघातग्रस्त, हृदयविकार, मेंदूविकार तसेच इतर गंभीर आजारांचे तातडीने निदान करता येत आहे. वर्ष २०२३ ते जून २०२६ या कालावधीत ५३ हजारांहून अधिक सीटी स्कॅन करण्यात आले असून, दररोज सुमारे ६० ते ७० रुग्णांची तपासणी जात आहे.
सामान्य सीटी स्कॅनबरोबरच सीटी अँजिओग्राफी, कार्डियाक सीटी, सीटी गाईडेड बायोप्सी यांसारख्या विशेष तपासण्याही येथे नियमित केल्या जातात. त्यामुळे गंभीर आजारांचे निदान लवकर होऊन उपचारांना विलंब होत नाही. एकाच ठिकाणी २७ प्रकारच्या एमआरआय तपासण्या
मिरजेतील शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील रुग्णांना विविध अवयवांच्या एम.आर.आय च्या तपासण्या एकाच छताखाली उपलब्ध आहेत. त्यामध्ये मेंदू चे एमआरआय, मानेच्या मणक्याचे एमआरआय, छातीच्या मणक्याचा एमआरआय, कंबरेच्या मणक्याचा एमआरआय, संपूर्ण मणक्यांची तपासणी, पोटाची तपासणी, हृदयाची तपासणी, खांदा, कोपर, मनगट, हात व दंड यांची तपासणी यांचा प्रामुख्याने समावेश होतो. याशिवाय एमआर अँजिओग्राफी आणि व्हेनोग्राफीसारख्या विशेष तपासण्याही उपलब्ध आहेत. खासगी रुग्णालयांत महागड्या असलेल्या या सुविधा येथे अत्यंत माफक दरात दिल्या जातात. पात्र लाभार्थ्यांसाठी मोफत एमआरआयची सुविधा
सर्वसामान्य रुग्णांना दिलासा देण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने काही पात्र रूग्णांसाठी मोफत एमआरआय तपासणीची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. त्यामध्ये दारिद्र्यरेषेखालील पिवळे रेशनकार्डधारक, स्वातंत्र्यसैनिक, महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत रूग्णालयात दाखल पात्र लाभार्थी यांचा समावेश आहे. त्यामुळे आर्थिक अडचणींमुळे तपासणी पुढे ढकलणाऱ्या रुग्णांना मोठा आधार मिळत आहे. माफक दरात अत्याधुनिक सेवा
मिरज शासकीय रुग्णालयात एमआरआय, कॉन्ट्रास्ट एमआरआय, एका भागाची एमआरआय, एमआर अँजिओग्राफी आणि व्हेनोग्राफी अशा सुमारे २७ प्रकारच्या तपासण्या खासगी रुग्णालयांच्या तुलनेत अत्यंत कमी दरात उपलब्ध आहेत. यामध्ये मेंदूचा एमआरआय – रू. २,०००, कार्डियॅक एमआरआय – रू. २,२००, एमआर अँजिओग्राफी/व्हेनोग्राफी – रू. ४,००० अशा माफक दरांमध्ये तपासण्या केल्या जात आहेत. यावेळी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना या रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ प्रकाश गुरव म्हणाले आमच्याकडे आधुनिक यंत्रसामग्री, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर, माफक शुल्क, पात्र लाभार्थ्यांसाठी मोफत सेवा आणि अचूक निदान यामुळे मिरजचे शासकीय रुग्णालय हे केवळ शासकीय रुग्णालय न राहता सर्वसामान्यांसाठी आधुनिक, विश्वासार्ह आणि परवडणारे निदान केंद्र म्हणून नवी ओळख निर्माण करत आहे. शासकीय रूग्णालयात या सुविधा उपलब्ध झाल्यामुळे सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर तसेच कर्नाटक सीमाभागातील हजारो रुग्णांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचत आहेत. खासगी रुग्णालयांत मोठा खर्च करून कराव्या लागणाऱ्या अनेक तपासण्या आता माफक दरात, तर पात्र लाभार्थ्यांना मोफत उपलब्ध होत आहेत. त्यामुळे सांगलीसह पश्चिम महाराष्ट्र आणि सीमाभागातील हजारो रुग्णांसाठी मिरज सिव्हिल आधुनिक निदानाचे विश्वासार्ह केंद्र बनले आहे.
Leave a Reply