Advertisement

‘द इव्हिनिंग रिट्रीट’ सांगलीतील काळीखण मधील संगीत कारंजे उद्यापासून पुन्हा सुरु होणार

प्रतिनिधी सुधीर गोखले

काही दिवसांपासून बंद असलेला आणि सांगली सह मिरज आणि कुपवाड  शहराच्या सौंदर्यात भर घालणारा तसेच नागरिकांच्या पसंतीस उतरलेला अत्यंत महत्त्वाकांक्षी ’द इव्हिनिंग रिट्रीट’ म्हणजेच काळीखण सुशोभीकरण प्रकल्पातील महत्वाचा संगीत कारंजा सर्व तांत्रिक दुरुस्तीनंतर पुन्हा एकदा नागरिकांसाठी खुला करण्यात येणार असल्याची घोषणा आज महानगरपालिका आयुक्त संजीता महापात्र यांनी केली. नागरिकांची सुरक्षितता आणि अत्याधुनिक सुविधांचा दर्जा अधिक उत्तम करण्यासाठी हा प्रकल्प गेल्या काही दिवसांपासून तात्पुरता बंद ठेवण्यात आला होता. प्रशासनाने युद्धपातळीवर सर्व तांत्रिक कामे यशस्वीरीत्या पूर्ण केली असून आता हा निसर्गरम्य परिसर सांगलीकरांच्या विरंगुळ्यासाठी सज्ज झाला आहे. हा परिसर नागरिकांना फिरण्यासाठी अधिकाधिक सोयीचा व्हावा आणि प्रकल्पाची योग्य देखभाल व्हावी, यासाठी प्रशासनाने वेळेचे नवीन नियोजन निश्चित केले आहे. १२ तासांच्या कालावधीत सर्व नागरिकांसाठी, विशेषतः मॉर्निंग वॉक आणि इव्हिनिंग वॉकला येणाऱ्यांसाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य असणार असल्याची माहिती आयुक्त मोहपात्र यांनी दिली आहे. मात्र रात्रीच्या वेळी म्हणजेच संध्याकाळी ६:०० ते रात्री १०:०० होणारा विजेचा वापर, अत्याधुनिक प्रकाश व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था आणि प्रकल्पाच्या दैनंदिन देखभालीचा खर्च पाहता, या वेळेत प्रवेशासाठी अत्यंत विहित आणि माफक शुल्क आकारले जाणार आहे. या संदर्भात आयुक्त संजीता महापात्र म्हणाल्या, “काळीखण प्रकल्प हा आपल्या तीनही शहराचे वैभव आहे आणि ही संपूर्ण मालमत्ता आपल्या सर्वांची आहे. सर्व महापालिका क्षेत्रातील  नागरिकांनी या निसर्गरम्य आणि नयनरम्य परिसराचा आनंद अवश्य घ्यावा. मात्र, त्याच वेळी येथील स्वच्छता, सौंदर्य, पर्यावरण आणि शिस्त राखण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे.” या प्रकल्पामुळे नागरिकांना पुन्हा एकदा हक्काचे आणि सुंदर विरंगुळा केंद्र उपलब्ध झाले असून, उद्यापासून हे नवीन नियम लागू होतील, असे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!