प्रतिनिधी सुधीर गोखले

मान्सून आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या संभाव्य पूरनियंत्रणासाठी महापालिका प्रशासन यंत्रणा सज्ज; आयुक्त संजीता महापात्र
आगामी मान्सून आणि संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ मैनाक घोष आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी आज महानगरपालिकेच्या मध्यवर्ती आपत्ती व्यवस्थापन केंद्राला (मंगलधाम, सांगली) भेट देऊन पूर्वतयारीची प्रत्यक्ष पाहणी केली. आपत्ती काळात नागरिकांना त्वरित मदत मिळण्यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका यांनी अत्यंत समन्वयाने काम करावे, अशा सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. या पाहणी दरम्यान महानगरपालिका आयुक्त संजीता महापात्र यांनी महापालिकेतर्फे करण्यात आलेल्या मान्सून पूर्व नियोजनाची आणि तांत्रिक सज्जतेची सविस्तर माहिती दिली. या पाहणी दरम्यान २४x७ वॉर रूम (War Room) आणि आपत्ती व्यवस्थापन केंद्रातील अत्याधुनिक नियंत्रण कक्ष याची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. महापालिका क्षेत्रात २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार असून, सर्व विभागांशी तो वायरलेस आणि वॉकी-टॉकीद्वारे जोडण्यात आला आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीवर लक्ष ठेवण्यासाठी तैनात करण्यात आलेली सीसीटीव्ही मॉनिटरिंग यंत्रणा आणि ‘वेदर मॉनिटरिंग स्टेशन’च्या कार्यपद्धतीचा आढावा घेण्यात आला.महापालिकेने तयार केलेले ‘आपत्ती मित्र’ ॲप आणि प्रभागनिहाय तैनात करण्यात आलेली तातडीच्या उपाययोजनांची पथके (Response Teams) कशा प्रकारे काम करणार, याचे सादरीकरण करण्यात आले. आपत्ती काळात शोध व बचाव कार्यासाठी लागणारे बोट, कटर, इमर्जन्सी लाईट्स या साहित्याची तपासणी करण्यात आली. तसेच संभाव्य पूरबाधित सखल भागातील नागरिकांच्या स्थलांतरासाठी निश्चित करण्यात आलेल्या निवारा केंद्रांमधील सुविधांचा आढावा घेण्यात आला. यावेळी महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद रजपूत तांत्रिक अधिकारी बंदेनवाझ पिरजादे व कर्मचारी उपस्थित होते.



Leave a Reply