वैजापूर तालुक्यासाठी स्वतंत्र MH57 अनुक्रमांक सह RTO कार्यालयास मान्यता
मा.आ.श्री.रमेश पा.बोरनारे सर यांच्या गेल्या पाच वर्षांपासून च्या सततच्या पाठपुरव्यास अखेर यश मिळाले .
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
वैजापूरच्या गाड्यांवर MH 57 चा फलक झळकणार
मॉरल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर :वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर येथे वाहन नोंदणी संख्या आणि एकूण लोकसंख्या यांचा विचार करून स्वतंत्र उप प्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाने मान्य केला आहे. गृह विभागाने या संदर्भात आदेश जारी केला आहे, ज्यामध्ये उप प्रादेशिक परिवहन अधिकारी दर्जाच्या MH-57 या नोंदणी क्रमांकासह नवीन कार्यालय सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
या नुसार नवीन कार्यालयासाठी आवश्यक पदांची निर्मिती करण्यात येईल, तर काही पदे इतर कार्यालयांमधून समायोजित केली जातील. कार्यालय सुरू करण्यासाठी शासकीय किंवा खासगी मालकीची जागा भाडेतत्त्वावर घेण्याची कार्यवाही तात्काळ केली जाणार आहे. या कार्यालयासाठी एक इंटरसेप्टर वाहन मंजूर करण्यात आले आहे, मात्र त्याची खरेदी करण्याआधी वाहन आढावा समितीची मान्यता आवश्यक असेल.
दरम्यान, परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी कार्यालयाची स्थापनाबाबत सर्व कार्यवाही वेळेत पूर्ण करून शासनास अहवाल सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. नव्या उप प्रादेशिक कार्यालयामुळे वैजापूर आणि आस-पासच्या जिल्ह्यातील नागरिकांना वाहन नोंदणी, परवाने व करप्रक्रिया अधिक सोप्या आणि जलद मिळण्याची आशा आहे.