विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने घरफोडीच्या गुन्ह्याचा यशस्वी छडा लावत सुमारे 2 लाख 34 हजार 750 रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये 18 साधे अॅल्युमिनियम ट्रॅक अॅल्युमिनियमचे 5 तुकडे, 20 स्टेनलेस स्टील पट्ट्या, अॅल्युमिनियम पट्ट्या तसेच इतर साहित्य असा एकूण 2,34,750 रुपयांचा माल समाविष्ट आहे.
या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 208/2026 अन्वये बीएनएस कलम 303(2) व 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना शिरूरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला.
तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयिताचा शोध घेतला. चौकशीदरम्यान आरोपीने चोरीची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश माने, पोलीस अंमलदार योगेश पाटील, गणेश बामणे व गुन्हे शोध पथकातील इतर कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
सदर प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश माने हे करीत आहेत.
Leave a Reply