मिरजेत बालवारकऱ्यांचा भक्तीचा महासागर; हजारोंच्या उपस्थितीत भव्य बालगोपाळ रिंगण सोहळा संपन्न: माजी मंत्री तथा आमदार डॉ सुरेशभाऊ खाडे यांनी धरला फुगडीचा फेर
आषाढी एकादशी निमित्त आमदार डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यांच्या पुढाकारातून आयोजन; टाळ-मृदुंगाच्या गजरात दुमदुमली मिरज नगरी
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त मिरज नगरीत वारकरी संस्कृतीचे भव्य आणि भक्तिमय दर्शन घडले. आमदार तथा माजी पालकमंत्री डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या बालगोपाळ रिंगण सोहळ्यात हजारो बालवारकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत संपूर्ण शहर विठ्ठल नामाच्या जयघोषाने दुमदुमून सोडले. मिरजेतील ऐतिहासिक लक्ष्मी मार्केट परिसरात पार पडलेल्या या सोहळ्यात विविध शाळांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालक, शिक्षक आणि वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. टाळ, मृदुंग, वीणा आणि अभंगांच्या सुरांनी परिसर भक्तिमय झाला. पारंपरिक वारकरी वेशभूषेत सजलेल्या लहानग्या बालवारकऱ्यांनी “पांडुरंग… पांडुरंग…”च्या अखंड जयघोषात रिंगणात सहभाग घेतला. विठ्ठल-रखुमाईच्या नामस्मरणाने आणि हरिनामाच्या गजराने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले ते हजारो बालवारकऱ्यांनी साकारलेले भव्य रिंगण. टाळ-मृदुंगाच्या तालावर अभंग, फुगड्या आणि हरिनामाचा गजर करत लहानग्यांनी वारकरी परंपरेचे जिवंत दर्शन घडवले. त्यानंतर शिस्तबद्ध दिंडी काढून भक्ती, संस्कार आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला. आजच्या आधुनिक युगात नव्या पिढीला भारतीय संस्कृती, संत परंपरा आणि वारकरी संप्रदायाचे संस्कार मिळावेत, या उद्देशाने या उपक्रमाचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. यंदाही हजारो विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे हा सोहळा विशेष आकर्षणाचा ठरला. या भव्य आयोजनाबद्दल आमदार डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यांच्या पुढाकाराचे नागरिकांनी स्वागत केले. भक्तिमय वातावरण, शिस्तबद्ध नियोजन आणि हजारो बालवारकऱ्यांच्या सहभागामुळे यंदाचा बालगोपाळ रिंगण सोहळा मिरजेच्या सांस्कृतिक इतिहासातील अविस्मरणीय सोहळा ठरला.
Leave a Reply