समाजसेवा ही केवळ नोकरी नसते, ती जगण्याची एक भूमिका असते. ही भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे निभावणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस हेड कॉन्स्टेबल फारुख नालबंद. गेल्या वीस वर्षांपासून सांगली जिल्हा पोलीस दलात ते कर्तव्य बजावत असून, पोलीस अधिकारी आणि सर्पमित्र या दोन्ही भूमिकांमध्ये त्यांनी समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे. कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीमुळे त्यांना सेवाकाळात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून शेकडो बक्षिसे, प्रशस्तीपत्रे आणि गौरव प्राप्त झाले आहेत. त्यांच्या उत्कृष्ट सेवेला मिळालेला सर्वोच्च सन्मान म्हणजे सन २०२१ मध्ये प्रदान करण्यात आलेले महाराष्ट्र पोलीस दलातील अत्यंत प्रतिष्ठेचे “पोलीस महासंचालक पदक”. हे पदक सातत्यपूर्ण, उल्लेखनीय आणि आदर्श सेवेसाठी दिले जाते आणि पोलीस दलातील अत्यंत मानाचा सन्मान मानला जातो. याशिवाय सन २०१४ मध्ये महाराष्ट्र पोलीस दलात प्रथमच पोलीस महासंचालक कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या “मानवी हक्क आणि पोलिसांची मूलभूत कर्तव्ये” या विषयावरील राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेत त्यांनी प्रथम क्रमांक मिळवून आपल्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाची आणि प्रभावी वक्तृत्वाची छाप संपूर्ण राज्यभर उमटवली. मात्र, त्यांची ओळख केवळ एक उत्कृष्ट पोलीस अधिकारी म्हणूनच मर्यादित राहत नाही. पोलीस सेवेत दाखल होण्यापूर्वीपासूनच त्यांना सर्पसंवर्धनाची आवड होती आणि त्यांनी सर्पमित्र म्हणून कार्य करण्यास सुरुवात केली. पोलीस दलात दाखल झाल्यानंतर कर्तव्याच्या व्यापामुळे या कार्याचा वेग काहीसा कमी झाला; मात्र आज ते पुन्हा पूर्ण क्षमतेने सर्परेस्क्यू आणि जनजागृतीचे कार्य करत आहेत. आजपर्यंत त्यांनी ३,००० हून अधिक सापांचे यशस्वी आणि सुरक्षित रेस्क्यू केले असून, त्यांना नैसर्गिक अधिवासात मुक्त केले आहे. पोलीस कर्तव्यावर असताना सर्परेस्क्यूसाठी जाता येत नसल्यास त्यांच्या मिरज रेस्क्यू टीममधील सहकारी मंगेश बीसले, मोहसिन शेख आणि आर्यन शिंदे हे तत्परतेने ही जबाबदारी पार पाडतात. त्यांच्या मते, वन्यजीव संवर्धन हे एकट्याचे नव्हे, तर सांघिक प्रयत्नांचे कार्य आहे. एखाद्या घरात, शेतात, कारखान्यात किंवा सार्वजनिक ठिकाणी साप आढळल्याची माहिती मिळताच ते शक्य तितक्या लवकर घटनास्थळी पोहोचतात. नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेत सापाचे सुरक्षित रेस्क्यू करणे आणि त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करणे, हे त्यांचे ध्येय असते. त्यांच्या या कार्यामुळे असंख्य सापांचे प्राण वाचले असून अनेक नागरिक संभाव्य अपघातांपासून सुरक्षित राहिले आहेत. त्यांच्या आयुष्यातील अनेक रेस्क्यू आजही स्मरणात आहेत. त्यापैकी एक प्रसंग विशेष भावनिक आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी मिरज एमआयडीसीमध्ये सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या एका वृद्ध महिलेच्या घरात साडेपाच फूट लांबीचा विषारी नाग शिरला होता. भीतीने संपूर्ण परिसर हादरला होता. फारुख नालबंद यांनी शांतपणे त्या नागाचे सुरक्षित रेस्क्यू केले. रेस्क्यू झाल्यानंतर त्या आजीबाईंनी कृतज्ञतेपोटी अनेक दिवस जपून ठेवलेली पन्नास रुपयांची एक जुनी, चुरगळलेली नोट त्यांच्या हातात ठेवण्याचा प्रयत्न केला. तो क्षण त्यांच्यासाठी अत्यंत भावनिक होता. त्यांनी ती रक्कम नम्रपणे नाकारली आणि उलट स्वतःजवळील पाचशे रुपये त्या आजीबाईंना देत, “आज तुमच्यामुळे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा नाग सुरक्षित पकडण्याची संधी मिळाली,” असे सांगितले. त्या वृद्ध महिलेने भरल्या डोळ्यांनी दिलेले आशीर्वाद आजही त्यांच्या स्मरणात कायम आहेत. असाच आणखी एक प्रसंग मिरजमधील एका कुटुंबाशी संबंधित आहे. नुकतेच बाळंतपण झालेल्या एका महिलेच्या कॉटखाली मोठ्या आकाराची धामण जाऊन बसली होती. एका बाजूला नवजात बाळ आणि दुसऱ्या बाजूला साप असल्याने ती महिला अक्षरशः हलूही शकत नव्हती. माहिती मिळताच फारुख नालबंद यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन धामणचे सुरक्षित रेस्क्यू केले आणि त्या कुटुंबाला मोठा दिलासा दिला. त्या घटनेनंतर त्या कुटुंबाशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले असून, आजही त्या महिला प्रत्येक भाऊबीजेला त्यांना भावाप्रमाणे घरी बोलावतात. ते नेहमी सांगतात, “साप माणसाचा शत्रू नाही; तो निसर्गाचा एक महत्त्वाचा घटक आहे. भीतीमुळे नव्हे, तर ज्ञानामुळे आपण त्याच्याकडे पाहायला शिकले पाहिजे.” समाजात सापांविषयी असलेले गैरसमज, अंधश्रद्धा आणि चुकीच्या समजुती दूर करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. विषारी आणि बिनविषारी सापांची ओळख, सर्पदंशानंतरचे योग्य प्रथमोपचार, सापांचे पर्यावरणातील स्थान आणि वन्यजीव संरक्षणाचे महत्त्व याबाबत ते शास्त्रीय माहिती लोकांपर्यंत पोहोचवतात. शाळा, महाविद्यालये, विविध शासकीय कार्यालये, सामाजिक संस्था आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांनी २५ ते ३० सर्पजागरूकता व्याख्याने दिली आहेत. त्यांच्या प्रभावी मांडणीमुळे विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांमध्ये सापांविषयीची भीती कमी होऊन वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होत आहे. डिजिटल माध्यमाचा प्रभावी वापर करत त्यांनी “वर्दीतील सर्पमित्र” या यूट्यूब चॅनेलद्वारेही जनजागृतीचे कार्य सुरू ठेवले आहे. सर्परेस्क्यू, वन्यजीव संरक्षण, सर्पदंश प्रतिबंध, पर्यावरण संवर्धन आणि वैज्ञानिक माहिती यांवर आधारित त्यांचे व्हिडिओ हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचे काम करत आहेत. पोलीस अधिकारी म्हणून शिस्त, धैर्य, संवेदनशीलता आणि जबाबदारी या मूल्यांचा त्यांनी आपल्या प्रत्येक कृतीत अवलंब केला आहे. त्याच मूल्यांच्या आधारावर सर्पमित्र म्हणूनही त्यांनी नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. असंख्य धोकादायक रेस्क्यू करतानाही किरकोळ प्रसंग वगळता त्यांना कधीही गंभीर सर्पदंशाचा सामना करावा लागलेला नाही. या सुरक्षिततेचे श्रेय ते योग्य प्रशिक्षण, काळजीपूर्वक काम करण्याची सवय आणि ज्येष्ठांच्या आशीर्वादांना देतात. आजच्या धावपळीच्या युगात सरकारी नोकरीची जबाबदारी सांभाळत समाजासाठी आणि निसर्गासाठी निःस्वार्थ भावनेने कार्य करणारे फारुख नालबंद हे अनेक युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. पोलीस सेवेतील उत्कृष्ट कामगिरी, राज्यस्तरीय गौरव, प्रभावी वक्तृत्व आणि वन्यजीव संवर्धनासाठीची अखंड तळमळ यांचा सुंदर संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात पाहायला मिळतो. “साप दिसला तर मारू नका… प्रशिक्षित सर्पमित्राला बोलवा. प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे.” हा त्यांचा संदेश आज हजारो नागरिकांपर्यंत पोहोचत असून, पर्यावरणपूरक आणि संवेदनशील समाज घडविण्यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत
Leave a Reply