Advertisement

उमाबाई श्राविका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न.

उमाबाई श्राविका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न.


दिनांक 18 फेब्रुवारी 2026 वार बुधवार सोलापूर स्थित श्राविका संकुलातील उमाबाई श्राविका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात, जल्लोषात साजरी करण्यात आली.
यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे तर प्रमुख अतिथी म्हणून प्रशालेच्या वरिष्ठ दीप्ती शहा, उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित,पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ यांची उपस्थिती होती.


कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन व पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रशालेतील सहशिक्षिका सोनाली उंडे व पल्लवी खांडवे यांनी सुमधुर अशा शिव वंदना गीताचे सादरीकरण करून वातावरण शिवमय केले.
प्रास्ताविकाच्या माध्यमातून प्रशालेचे मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे सर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची संकल्पना, तत्कालीन निजामशाही आदिलशाही व कुतुबशाही यांच्याशी लढा देऊन विजय प्राप्त केला. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी आपल्यासमोर असलेल्या समस्यांशी संघर्ष करून त्यांचा बाऊ न करता सामना करावा असा संदेश दिला. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आई जिजाऊ व गुरूंकडून संस्कार व शिस्तीचे धडे घेतले त्याप्रमाणे आजच्या विद्यार्थ्यांनी देखील आई-वडील व गुरूंकडून मिळणारे संस्कार व शिस्तीचे धडे आत्मसात करावेत असा सल्लाही विद्यार्थ्यांना दिला.

प्रशालेतील इयत्ता आठवी अ तील विद्यार्थिनी रामेश्वरी बंडगर या विद्यार्थिनीने आपल्या भाषणातून शिवाजी महाराज व अफजलखान यांच्या भेटीच्या प्रसंगाचे अतिशय रोमहर्षक व उत्कंठावर्धक वर्णन करून तो प्रसंग डोळ्यासमोर उभा केला. तसेच समृद्धी जाधव या विद्यार्थिनींने देखील शिवरायांची स्त्रियांबद्दलची आदर व सन्मानाची भूमिका आपल्या भाषणातून स्पष्ट केली. प्रशालेचे पर्यवेक्षक व शिवव्याख्याते बाळासाहेब पौळ यांनी आपल्या अमोघ वाणीतून शिवचरित्राची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. शिवाजी महाराजांनी जीवाला जीव देणारे सवंगडी कशा पद्धतीने तयार केले, शिवरायांची युद्धनीती, राज्यकारभार व सुशासन, निसर्गाबद्दलचा दृष्टिकोन,या सर्व गोष्टी आपण अभ्यासण्याची आवश्यकता असल्याचं मत त्यांनी आपल्या मनोगताद्वारे व्यक्त केले. इयत्ता सातवी क तील विद्यार्थ्यांनी याप्रसंगी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा प्रसंग सादर करून विद्यार्थ्यांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी केलेल्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. इयत्ता सहावीतील अनुष्का साळुंखे व तिच्या संचाने सादर पोवाड्याने वातावरण शिवमय झाले होते. इयत्ता सातवी क च्या वर्गशिक्षिका सोनाली उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सातवी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे सुंदर नियोजन केले होते. प्रशालेचे कलाशिक्षक प्रवीण कंदले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे रेखाटलेले चित्र सर्वांचे आकर्षण ठरले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरयू भोसले व पूर्वी पूर्वी म्हमाणे या विद्यार्थिनींनी तर आभार सोनाली उंडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख माधवी खोत, सोनल आळंद, प्रीती वऱ्हाडे, सुहास छचुरे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!