जळगाव : तरुणाचा निर्घृण खून , ९ तासांनी सापडला मृतदेह….
जळगाव शहरातील तरुणाचा आर्थिक कारणावरून त्याच्याच मित्राने मुक्ताईनगर शिवारातील डोलारखेडा भागात कुंड परिसरात निर्घृण खून करून मृतदेह नदीपात्रात फेकल्याची धक्कादायक घटना शुक्रवार दि. १९ जुलै रोजी पहाटे उघडकीस आली आहे. दरम्यान नदीपात्रात शोधमोहीम घेतल्यानंतर तब्बल ९ तासांनी त्याचा मृतदेह हात पाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे. मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. नितीन साहेबराव पाटील (वय २५, रा. कला वसंत नगर, असोदा रोड, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई, वडील, मोठा भाऊ यांच्यासह राहत होता. काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे रेल्वेत अप्रेंटीशीप करून तो जळगावात परतला होता. (केसीएन) नितीनचे वडील हे हार्डवेअरच्या दुकानात मजुरी काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान, नितीन पाटील याच्या एका मुक्ताईनगर येथील मित्राने त्याच्याकडून १ लाख रुपये उसनवारीने घेतले होते. उसनवारीने घेतलेले पैसे नितीन पाटील हा सारखा त्याच्या मित्राला मागायचा. मात्र नितीन पाटीलचा हा तगादा त्याच्या मित्राला आवडला नाही. (केसीएन) त्यामुळे संशयित आरोपी याने गुरुवारी दि. १८ जुलै रोजी नितीन पाटील याला मुक्ताईनगर येथे बोलावून घेतले. “इकडे ये पैसे घेऊन जा आणि एका कार्यक्रमाला जायचे आहे, तिकडे आपण जाऊ” असे सांगून संशयित आरोपीने नितीन पाटीलला बोलावून घेतले. त्यानंतर डोलारखेडा शिवारात नेऊन तेथे काही मित्रांच्या मदतीने त्याचा खून करून मृतदेह हात पाय बांधून पूर्णा नदी पात्रात फेकून दिला. दरम्यान, त्याचा संपर्क होत नसल्याने त्याचे कुटुंबिय हे मुक्ताईनगर पोलीस स्थानकात आले. याप्रसंगी नितीन पाटील यांच्यासोबत असणारा एक युवक देखील पोलीस स्थानकात आला. या तरूणाने काही जणांनी नितीनला कुंड गावाजवळच्या जंगलात मारून त्याचा मृतदेह पुर्णा नदीच्या पात्रात टाकून दिल्याचे सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी माहिती देणार्या तरूणाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात अन्य आरोपींचा सहभाग असून त्याचा तपास देखील सुरू आहे. मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला ही माहिती कळताच त्यांनी शुक्रवारी पहाटे २ वाजेपासून पूर्णा नदीपात्रात मृतदेहाचा शोध घ्यायला सुरुवात केली. तब्बल ९ तासांनी त्यांना मयत नितीन पाटील यांचा मृतदेह हात पाय बांधलेल्या अवस्थेत सापडला. मृतदेह मुक्ताईनगर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. (केसीएन) त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले. घटने प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांनी “केसरीराज”ला दिली. दरम्यान या घटनेमध्ये संशयित आरोपी याला अटक करण्यात आली आहे. खूनाच्या घटनेमुळे मुक्ताईनगर हादरले असून नितीन पाटीलच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.