
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, हिवताप (मलेरिया), चिकनगुनिया आणि झिका यांसारख्या कीटकजन्य आजारांचा संभाव्य धोका लक्षात घेता, सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाय योजनांना गती दिली आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून जुलै महिन्यामध्ये ‘डेंग्यू प्रतिरोध महिना’ अंतर्गत महापालिका सभागृहात आरोग्य यंत्रणेसाठी एका विशेष तांत्रिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग आणि सांगली महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळेत आरोग्य यंत्रणेला अद्ययावत करण्यावर भर देण्यात आला. विभागीय आरोग्य सहाय्यक संचालक (हिवताप) डॉ. संजय रणवीर यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन केले. डेंग्यू आणि झिका आजार पसरवणाऱ्या ’एडिस इजिप्ती’ डासांची उत्पत्ती स्थाने शोधून ती नष्ट करण्याच्या वैज्ञानिक पद्धतींवर चर्चा करण्यात आली. ताप असलेल्या रुग्णांचे तातडीने सर्वेक्षण करणे, रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्याची अचूक पद्धत आणि जलद निदानाबाबत प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले. राज्यात आढळणाऱ्या झिका विषाणूच्या पार्श्वभूमीवर गर्भवती महिलांची विशेष काळजी घेणे आणि संशयित रुग्णांची हाताळणी करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेस महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुचेता पवार, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रवीणकुमार पाटील, अति. जिल्हा हिवताप अधिकारी प्रतिभा पाटील, झोनल एन्टॉलॉजिस्ट सतीश सावंत, तसेच आरोग्य पर्यवेक्षक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी आणि महापालिका क्षेत्रातील सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आरोग्य यंत्रणेतील तळागाळातील कर्मचारी, म्हणजेच आरोग्य सेवक व आरोग्य सेविका यांनी घरोघरी जाऊन प्रभावी सर्वेक्षण करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. नागरिकांनी आपल्या घराभोवती पाणी साचू देऊ नये, कुंड्या, कुलर आणि टायरमधील पाणी वेळोवेळी रिकामे करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. साथीचे आजार रोखण्यासाठी महापालिकेची संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज असून, नागरिकांनी कोणत्याही तापाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्वरित जवळच्या नागरी आरोग्य केंद्राशी साधावा असे आवाहन आले.
Leave a Reply