Advertisement

मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे अत्याधुनिक लाँड्री विभाग आणि मेल सर्जिकल सेमी आयसीयूचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाले लोकार्पण

आज मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उभारलेल्या अत्याधुनिक लाँड्री विभाग जो जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून सुमारे ४ कोटी ७० लाख रुपये प्राप्त झाले होते या निधीमधून हा विभाग उभारला गेला असून येथे अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली यंत्रणा उभारण्यात आली आहे. येथे एकूण ६०किलो क्षमतेची ५ धुलाई मशीन बसवली गेली आहेत तर ४ कपडे वाळण्यासाठी मशीन आहेत आणि एक ब्लॅंकेट प्रेस करण्याचे मशीन आहे. या सर्व यंत्रणा स्वयंचलित आहेत यामुळे मनुष्यबळाचा वापर कमी होणार आहे वेळेतही बचत होईल. रूग्ण सेवेमध्ये जंतू मुक्त कपडे वापरले जाणार आहेत. या सर्व यंत्रणेमध्ये कपडे धुणे वाळवणे आणि इस्त्री करण्याची प्रक्रिया असल्याने यापुढे मिरजेतील शासकीय रुग्णालय आता खाजगी रुग्णालयाच्या धर्तीवर काम करेल. याबरोबरच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मेल सर्जिकल सेमी आयसीयू उभारणीसाठी सुमारे ४ कोटी ९० लाख इतका निधी प्राप्त झाला होता यामधून या विभागाची उभारणी करण्यात आली असून आज या दोन्ही विभागाचे लोकार्पण राज्याचे उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री तथा पालकमंत्री ना चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार इद्रिस नायकवडी यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलीस अधीक्षक तुषार दोषी, माजी सभापती आणि नगरसेवक निरंजन आवटी, नगरसेवक गणेश माळी, माजी नगरसेवक योगेंद्र थोरात उपस्थित होते. मंत्री महोदयांचे स्वागत महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ प्रकाश गुरव यांनी केले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सांगली पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘नशामुक्त सांगली’अभियानाचा शुभारंभही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पालकमंत्री ना चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, ‘जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या या अत्याधुनिक सुविधांमुळे रुग्णांना अधिक दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होण्यास मदत होईल. तसेच ‘नशामुक्त सांगली’अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करून युवकांसह समाजाला व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यावेळी नव्याने उभारण्यात आलेल्या सुविधांची पाहणी करून उपलब्ध यंत्रणेची माहिती पालकमंत्र्यांनी घेतली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैद्यकीय अधीक्षक डॉ रुपेशकुमार शिंदे यांनी केले यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रियांका राठी, विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, महानगरपालिका गटनेते संदीप आवटी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दीपक शिंदे-म्हैशाळकर तसेच रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!