सत्यार्थ न्यूज रिपोर्टर :- किरण माळी
जळगांव, महाराष्ट्र
▪️आवाजाच्या दुनियेतला धरणगावचा बादशहा यूनूस..!!
युनूस हा माझा महात्मा फुले हायस्कूल मधील दहावी पर्यतचा क्लासमेट होता. आम्हा गौतम नगर मधील मुलांसोबत तो वेळप्रसंगी राॅकेलच्या चिमणीच्या किंवा नगरपालिकेच्या स्ट्रीट लाईटच्या प्रकाशात अभ्यास करायचा.ईदला शिरखूर्मा खायला घरी बोलवायचा. त्याचे आवाजाबरोबरच अक्षरही सुंदर होते. शाळेच्या फावल्या वेळात मुलांचा ऑर्केस्ट्रा रंगायचा. तो उत्तम गायकही होता. किशोर कुमारचे गाणंही उत्तम गायचा. उत्तम वाजवायचा.अमिताभ बच्चन पासून ते निळे फुलेंपर्यतच्या अभिनेत्यांचे हुबेहूब आवाज काढायचा. उत्तम मिमिक्री करायचा. अमीन सयानीच्या आवाजाने तो खऱ्या अर्थाने प्रकाशात आला. तो खरंच आवाजाच्या दुनियेतला धरणगावचा बादशहा होता. सुरवातीच्या काळात त्याने स्टेज शो गाजवलेत पण धरणगावात त्याच्या कलाकारीचे चीज झाले नाही. तो मराठीतूनच बोलायचा. मध्यंतरी त्याचे पाय सुजले, वजन वाढले. मला वाटतं त्याचं अशा अकाली जाण्याचं हेच निमित्त झालं असावं. म्हणतात ना, कलाकार कभी मरता नही, उसे जिंदा दफनाया जाता है… कदाचित युनूसचे असेच दफन केले जाणार आहे. त्याच्या आवाजाची जादू त्याच्या चाहत्यांच्या हृदयातून कधीच ओसरणार नाही.
युनूसला भावपूर्ण श्रद्धांजली.