गुरू-शिष्यांनी वादळ निर्माण केलं
लेखांक ९
✒️ पियूष गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी ✒️
बाबासाहेबांनी १९ मार्च व २० मार्च इ.स. १९२७ रोजी महाड येथे कुलाबा परिषद भरवली. परिषदेच्या ठरावानुसार २० मार्च १९२७ रोजी परिषदेतील सर्वांनी आपला मोर्चा चवदार तळ्याकडे वळवला. डॉ. बाबासाहेबांनी सर्वप्रथम तळ्यातील पाणी ओंजळीने पिले, सर्व अनुयायांनी त्यांचे अनुसरण करत पाणी पिले. ही मानवतावादी घटना रूढीवादी स्पृश्य हिंदूंना सहन झाली नाही. त्यांनी हजारों दलितांसाठींच्या भोजनामध्ये माती मिसळली. लाठ्यां-काठ्यांनी हल्ले केले आणि तळे बाटवले म्हणून त्यात गोमूत्र टाकून तळ्याचे ब्राह्मणांकडून शुद्धीकरण केले. पुढे महाडच्या नगरपालिकेने अस्पृश्यांना चवदार तळे खुले केल्याचा ठरावही रद्द केला. त्यामुळे बाबासाहेबांनी २५ व २६ डिसेंबर रोजी महाड येथे सत्याग्रह परिषद घेण्याचे ठरवले. या परिषदेचा उद्देश स्पष्ट करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की, “आतापर्यंत आम्ही या तलावाचे पाणी पिऊ शकलो नाही. किंबहूना आम्हाला पिऊ दिले नाही. आता आम्ही पाणी प्यालो म्हणजे आमचे दुःख दूर होईल, आमची परिस्थिती सुधारेल किंवा आमच्यावरील अन्याय कमी होईल असा अर्थ नसून हा केवळ एका मानवाने दुसर्या मानवाला समानतेने कसे वागवावे हे सांगण्याचा व सर्व मानवाला समानतेचा अधिकार आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आहे.” समतेची मुहूर्तवेढ रोवण्यासाठी जगाच्या पाठीवरील केवळ पिण्याच्या पाण्यासाठी केलेला हा संगर इतिहासातील पहिला आणि एकमेव सत्याग्रह म्हणून ओळखला जातो.
“स्त्रियांची प्रगती ज्याप्रमाणात झाली असेल, त्यावरून समाजाची प्रगती मी मोजत असतो !” असे बाबासाहेब म्हणत.
स्त्रियांना पुरुषांप्रमाणे समान हक्क मिळावेत यासाठी त्यांनी अनेक चळवळी केल्यात. स्त्रियांची गुलामगिरी दूर व्हावी म्हणून संसदेत हिंदू कोड बिल सादर केलं. १९२७ ते १९५६ पर्यंतच्या काळात बाबासाहेबांनी भारतीय स्त्रीचा सामाजिक, कायदेशीर आणि राजकीय दर्जा वाढावा म्हणून सतत प्रयत्न केला. १९२७ च्या महाडच्या सत्याग्रहात व १९४२ साली नागपूरच्या परिषदेत त्यांनी महिलांना सांगितले की, स्वच्छता पाळा, सर्व दु्र्गुणांपासून दूर रहा, मुलामुलींना शिक्षण द्या, त्यांना महत्वाकांक्षी बनवा, त्यांचा न्यूनगंड दूर करा असा महत्वाचा उपदेश केला. दलित-शोषित-श्रमजिवींच्या हक्कासाठी लढा दिला. त्यांना मानाचे जीवन जगता यावे म्हणून ते सातत्याने संघर्ष करीत राहीले. केवळ दलितासाठीच नव्हे तर शेतकरी व मजूर यांच्या प्रश्नासंबंधी जोरदार लढा दिला.
त्यांनी चातुर्वर्ण्याधिष्ठित जन्मजात- जातवार विषमतेविरुद्ध आयुष्यभर संघर्ष केला. बाबासाहेब म्हणतात, ‘दलित वर्गाच्या हातात सत्ता गेली की ही चातुर्वर्ण्य विषमता धुळीला मिळालीच असे समजावे. आजवर ती टिकली याचे कारण राजसत्तेचा तिच्यावर कधीच मारा झाला नाही. राजसत्तेची तिच्यावर नेहमीच कृपा होती. (बहिष्कृत भारत १.१.१९२९) त्यांनी जन्मजात चातुर्वर्ण्याबरोबरच भांडवलशाही हाही आपला कायमचा शत्रू मानला.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राम्हण समाजाने बहुजन समाजाला कशा दलदलीत आणून फसविले याची जाणीव त्याला करून द्यावी आणि त्याला बुद्धिवादी विचारांचा मार्ग दाखवावा या उद्देशाने ‘रिडल्स इन हिंदूइझम’ हा ग्रंथ लिहीला. बाबासाहेब ‘Annihilation of Caste’ मध्ये म्हणतात की, ‘जाती नष्ट करण्यासाठी हिंदू शास्त्र नष्ट करावीत. You must not only discard the shastras, you must deny their authority, as did Buddha and Nanak. ‘
बाबासाहेब म्हणाले होते की, “तुमचा उद्धार करण्यास आता एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे राजकारण – कायदा करण्याची शक्ती…. आपल्या समाजाला स्वातंत्र्य, इज्जत व माणुसकी पाहिजे असेल तर आपल्याला राजकीय सत्ता काबीज करावयास पाहिजे. शोषित-पिडीत मागासवर्गीय व बहुजनांच्या राजकीय ऐक्याचे ध्येय समोर ठेवून अतिशय व्यापक दृष्टीकोनातून बाबासाहेबांनी १९३६ साली स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. परंतु त्यानंतर क्रिप्स मिशनची खेळी व स्वातंत्र्याच्या दिशेने होणा-या राजकीय घडामोडींचा परिणाम म्हणून बाबासाहेबांना ‘शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन’ची स्थापना करावी लागली. त्यानंतर समान विचारसरणीच्या व समाजवादी विचारांच्या पक्षांना व लोकांना एकत्रित करून लोकशाहीवादी प्रभावी विरोधी पक्ष स्थापण्याच्या प्रयत्नात बाबासाहेब होते आणि त्याच दृष्टीकोनातून त्यांनी ‘रिपब्लिकन पक्षा’ची संकल्पना मांडली होती. बाबासाहेबांनी त्याकरिता या पक्षाची घटना सुद्धा तयार केली होती.
बाबासाहेबांच्या अस्पृश्यता अन् जातीभेदाविरूद्ध महाडचा चवदार तळे आणि नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह, इंग्लंडची गोलमेज परिषद, सायमन कमिशनपुढे दिलेली साक्ष, ओबिसी आयोग आणि हिंदू कोड बिलात स्त्रीयांना समानतेच्या हक्कासाठी मंत्रीमंडळातून बाहेर पडण्याचा धाडसी निर्णय, भारतीय संविधानाची निर्मिती, शेतक-यांना न्याय देण्यासाठी खोती पद्धती निर्मूलनाचा संघर्ष, ब्रिटिशांच्या व्हाईसराय मंत्रीमंडळात मंत्री म्हणून घेतलेले कामगार आणि स्त्री कामगारांचे हक्कासाठी निर्णय, धर्माधीष्ठित गुलामगिरी झुगारून स्वातंत्र्य, समता व बंधूभाव अधिष्ठीत जीवनमार्ग देणा-या बुद्धाच्या धम्माचा स्वीकार या सा-या कृतीमागे समाजाचे आणि देशाचे कल्याण अभिप्राय आहे.