सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रातील तब्बल ८३७६० मालमत्ता धारकांसाठी महापालिकेने अभय योजना आणली आहे. यामध्ये घरपट्टी (मालमत्ता कर) थकबाकीदारांसाठी हि योजना असेल अशी माहिती आयुक्त संजीता मोहपात्र यांनी दिली त्या म्हणाल्या आगामी १ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीमध्ये थकीत घरपट्टी ची मूळ रक्कम भरल्यास विलंब शास्ती मध्ये (दंडव्याज) १०० टक्के सवलत दिली जाईल. या योजनेचा मालमत्ता धारकांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. सद्य स्थिती मध्ये मनपा क्षेत्रामध्ये ८३७६० मालमत्ता धारकांकडे एकूण ११९ कोटी ८१ लाख ७८ हजार ४३५ रु इतकी थकीत मालमत्ता कराची रक्कम आहे. यामध्ये ४१ कोटी ७ लाख इतकी दंडव्याज रक्कमेचा समावेश आहे. मालमत्ता कराच्या थकबाकी रकमेवर दरमहा २ टक्के इतका विलंब शास्ती शुल्क आकारला जातो. मात्र थकबाकी ची हि रक्कम फुगत चालली आहे महापालिका क्षेत्रातील विकास कामे या मुळे प्रलंबित राहू शकतात. मात्र नागरिकांच्या दिलाशासाठी आणि थकबाकी वसुली जलद होणेसाठी अभय योजना आम्ही सुरु करत आहोत. थकीत मालमत्ता धारकांनी एकत्रित पणे हि रक्कम भरल्यास तिजोरीमध्ये ७९ कोटी इतकी रक्कम जमा होऊ शकते. त्या पुढे म्हणाल्या,’ थकीत मालमत्ता कराची रक्कम भरण्यासाठी विलंब शास्ती मढेर सवलत देण्याचे आम्ही ठरवले आहे. वरील कालावधी मध्ये थकबाकी भरल्यास १०० टक्के विलंब शास्ती मध्ये सवलत मिळेल १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधी मध्ये थकबाकी भरल्यास ७५ टक्के तर १६ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधी मध्ये थकबाकी भरल्यास ५० टक्के विलंब शास्ती मध्ये सवलत मिळेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
Leave a Reply