प्रतिनिधी सुधीर गोखले
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयातील जन्म मृत्यू विभागातील अडचणीचे शुक्ल काष्ठ संपता संपेना अशी अवस्था झाली आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव केंद्राची सिविल रजिस्ट्रेशन सिस्टीम मधील दुहेरी लॉगिन प्रणाली बंद केल्याने मिरज कार्यालयातील जन्म मृत्यू विभागातील कामकाज पूर्णतः ठप्प झाला आहे. याचा परिणाम पुन्हा महापालिकेत जन्म मृत्यू दाखला घेण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढत असल्याचे चित्र आहे.केंद्र सरकारने जन्म आणि मृत्यू दाखले केंद्र प्रणालीशी जोडले जावे, या हेतूने बारकोडचे जन्म आणि मृत्यू दाखले देण्याचे सुरू केले आहे. यासाठी केंद्र सरकारने सिविल रजिस्ट्रेशन सिस्टीम विकसित केली आहे. या सिस्टीममध्ये नाव नोंदविल्यानंतरच संबंधितांना जन्म किंवा मृत्यू दाखला दिला जातो. सुरुवातीला सिविल रजिस्ट्रेशन सिस्टीमसाठी दुहेरी लॉगिन प्रणाली असल्याने नोंदणीचे काम वेगवेगळ्या संगणकावर केले जात होते. मात्र केंद्राने सुरक्षिततेचे कारण देत 18 मे 2026 पासून दुहेरी लॉगिन प्रणाली बंद करून केवळ एकेरी प्रणाली सुरू केली आहे. त्यामुळे एका प्रणालीवर जन्म किंवा मृत्यू दाखल्याची नोंद कधी करायची आणि दाखले वितरण कधी करायचे या विवेचनात कर्मचारी असल्याचे दिसते. याचा परिणाम जन्म मृत्यू विभागातील कामकाजावर होऊन पूर्णतः ठप्प झाला आहे. नागरिक मेटाकुटीस आले आहेत. म्हणून शुक्रवारी मिरज सुधार समितीचे ऍड. ए. ए. काझी, अध्यक्ष नरेश सातपुते, सुरेश झेंडे, तौफिक देवगिरी, वसीम सय्यद आदी सदस्यांनी सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांना जाब विचारला. केंद्र सरकारने पुन्हा सीआरएसची दुहेरी प्रणाली सुरू करावी. अन्यथा जन्म – मृत्यू विभागाला टाळे ठोकण्याचा इशारा मिरज सुधार समितीने जिल्हा आरोग्य अधिकारी विजय वाघमारे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे दिला आहे.




Leave a Reply