Advertisement

महापरिनिर्वाण दिन कसा पाळावा ?

महापरिनिर्वाण दिन कसा पाळावा ?

६ डिसेंबर हा परमपूज्य बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन ! या देशाच्या इतिहासातील हा एक अत्यंत दु:खद दिवस आहे. या दिवशी देशातील सामान्य जनतेचा मुक्तीदाता आम्हाला पोरके करून निघून गेला.

पियूष गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

या दिवशी आपल्या मुक्तीदात्याला अभिवादन करण्यासाठी देश-विदेशातून लाखोंच्या संख्येने जनता येते. या जनतेने चैत्यभूमीवर येताना , प्रत्यक्ष चैत्यभूमीवर व चैत्यभूमीवरून घरी जाताना काही पथ्ये पाळणे अगत्याचे आहे.

१. शांतता पाळणे : हा दिवस दु:खाचा असल्यामुळे सर्वांनी गांभीर्याचे पालन करावे. गडबड , गोंधळ , गोंगाट , चढ्या आवाजात बोलणे , कर्कश गाणी वाजवणे हे कटाक्षाने टाळायला हवे.
२. ⁠हा दु:खाचा दिवस असल्याने या दिवशी छानछोकीचे फॅशनेबल कपडे वापरू नयेत. साधे कपडे वापरावेत. तसेच रंगीबेरंगी टोप्या घालणे , शिट्ट्या वाजवणे , अर्वाच्य घोषणा देणे असे सर्व वाईट प्रकार आपण टाळायला हवेत.
३. या दिवशी मद्यपान , बिडी – सिगारेट , गुटखा – तंबाखू असे कोणतेही व्यसन करू नये.
४. ⁠या दिवशी प्रवास करताना सर्वांशी सौजन्याने वागावे. आपले आरक्षण असल्यास ते वापरताना शक्य असल्यास एखाद्या गरजू प्रवाशास सहकार्य करावे.
५. ⁠तुम्ही समूहाने प्रवास करीत असाल तर कृपया घोषणाबाजी टाळावी. आपल्या वागण्यामुळे कोणाला त्रास होणार नाही, याची आवर्जून काळजी घ्यावी.
६. ⁠या दिवशी चैत्यभूमीवर आल्यावर गायन पार्ट्या , सीडी विक्रेते , फेरीवाले यांच्याकडून खरेदी करून त्यांना प्रोत्साहन देऊ नका. तुम्हाला जी काही खरेदी करायची आहे त्यासाठी वर्षाचे 364 दिवस मोकळे आहेत. तसेच सर्व गायक – कलावंतांनी देखील गाणी म्हणून महापरिनिर्वाण दिनाच्या गांभीर्यास गालबोट लावू नये. आपल्या घरी कोणाचा मृत्यु झाल्यास आपण दुःखात असतो. मग डॉ आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी आपण गाणी कशी म्हणू शकतो ? इतर वेळेस तुम्ही गाणी म्हणा , गाणी विका ; परंतु महापरिनिर्वाण दिनी मात्र असे वागू नका. त्याचप्रमाणे सर्व राजकीय संघटनांना विनंती आहे कि , महापरिनिर्वाण दिनी आपल्या मंचावरून गाणे – बजावणे करण्यासाठी कलावंतांना बिदागीचे आमिष दाखवू नये. अन्यथा आपली संघटना महापरिनिर्वाण दिनाचे गांभीर्य पाळीत नाही , असे जनतेला वाटू शकते. कृपया या दिवशी गांभीर्याने वागावे.
७. ⁠सर्व विक्रेत्यांना विनंती आहे की, हा दिवस दु:खाचा आहे. म्हणून या दिवसाच्या गांभीर्याला गालबोट लागेल अशा वस्तूंची चैत्यभूमी परिसरात तात्पुरते स्टॅाल मांडून कृपया विक्री करू नये. अशी विक्री करण्यासाठी तुम्हाला वर्षाचे 364 दिवस मोकळे आहेत. महापालिका व पोलिस वगैरे शासकिय यंत्रणांनी सुद्धा असे प्रकार टाळण्यासाठी सर्वतोपरी काळजी घ्यावी.
८. ⁠आपण आपल्या मुक्तीदात्याला अभिवादन करायला आलो आहोत, हे लक्षात घेऊन या दिवशी समुद्रात बोटीने फेरफटका मारायला जाऊ नका किंवा मुंबईत इतस्ततः फिरु नका.
९. ⁠तुम्ही ज्या पक्ष – संघटनांचे कार्यकर्ते असाल त्या पक्ष – संघटनांना देखील हा दिवस गांभीर्याने पाळायला सांगा. तसेच प्रवास करताना आपण ज्यांच्याशी संबंधित आहोत अशा पक्ष संघटनांची स्तुती करताना इतरांवर टीका- टिप्पणी करू नका. शक्यतो सार्वजनिक ठिकाणी पक्षीय – संघटनात्मक चर्चा टाळावी.
१०. ⁠हा दिवस दु:खाचा असल्याने या दिवशी शक्यतो उपोसथ पाळावे. ज्यांना उपोसथ पाळणे शक्य नाही त्यांनी साधे भोजन घ्यावे. चैत्यभूमी परिसरात भोजन घेताना शिस्तबद्ध रांग लावावी, रेटारेटी करू नये. जेवढी भूक आहे तेवढेच भोजन घ्यावे. कृपया अन्नाची नासधूस करू नये.
११. ⁠महात्मा फुले यांची जयंती (11 एप्रिल) , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती (14 एप्रिल ते पावसाळा आरंभ), तथागत सम्यक संबुद्ध यांची जयंती (वैशाखी पौर्णिमा ) , शाहू राजे यांची जयंती (26 जून) , वर्षावास , सम्राट अशोक विजयादशमी (दसरा), महापरिनिर्वाण दिन (6 डिसेंबर) , भीमा कोरेगाव विजय दिन (1 जानेवारी) हे परिवर्तनवादी जनतेचे ‘जनसंपर्क दिवस’ आहेत. या दिवशी परिवर्तनवादी बौद्ध संस्कृती किती उच्च दर्जाची आहे , हे जनतेने आपल्या आचरणातून सर्व भारतीयांना दाखवायचे आहे. सणउत्सवांच्या नावाने चालणाऱ्या धांगडधिंगाण्यास सामान्य जनता विटली आहे. तसाच धांगडधिंगाणा परिवर्तनवादी घालू लागले तर ते ‘पर्याय’ देऊ शकणार नाहीत , हे लक्षात घ्या. म्हणून परिवर्तनवादी जनतेचा ‘जनसंपर्क’ हा सामान्य जनतेला आश्वासक व प्रेरणादायी वाटला पाहिजे. यांसाठी आवश्यक ती सर्व काळजी घेणे , हे सर्वस्वी परिवर्तनवाद्यांच्या हातात आहे.

१२. संविधान निर्मात्या डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांना अभिवादन म्हणून ‘कोणी कसेही वागो , आम्ही मात्र संविधानाचे पालन करून आदर्श नागरिक म्हणून जगणार व या देशाला नवी दिशा देणार’ असा दृढनिश्चय करू या !

कृपया हा संदेश सर्वत्र पाठवा.

विनित ,
शांत चैत्यभूमी अभियान, मुंबई

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!